पुणे- महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत असताना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गजा मारणेंच्या पत्नीनंतर आता स्वतःचा नातू आयुष कोमकर याच्या हत्या प्रकरणात आणि कोट्यवधींच्या खंडणी प्रकरणात येरवडा कारागृहात असलेल्या सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना उमेदवारी दिली आहे.
आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या कुटुंबाला मिळालेल्या या राजकीय पाठबळामुळे पुण्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. बंडू आंदेकर कुटुंबाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे या उमेदवारीबाबत अजित पवार गटाने सुरुवातीपासूनच कमालीची गुप्तता पाळली होती. अधिकृत घोषणा न करता थेट अर्ज भरण्यावर भर देण्यात आला. जेणेकरून विरोधाची धार कमी करता येईल. मात्र, आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी आंदेकर यांच्या वकिलांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात धाव घेत ‘एबी’ फॉर्म सादर केले आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आंदेकरांच्या वतीने त्यांच्या वकिलांनीच ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांनी निवडणूक लढवण्यासाठी विशेष न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. “निवडणूक लढवणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे,” असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्यांना अर्ज भरण्याची मुभा दिली. मात्र, न्यायालयाने काही कडक अटीही घातल्या आहेत.
अजित पवार यांच्या पक्षाकडून आज सकाळी कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे हिला उमेदवारी देऊन चर्चेला उधाण आणले होते. आता त्यानंतर लगेचच बंडू आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्याने, अजित पवारांच्या ‘गुन्हेगारीमुक्त पुणे’ या घोषणेचे काय झाले असा सवाल काहीज करत आहेत
आंदेकर कुटुंबाला देण्यात येणाऱ्या उमेदवारीला आयुषच्या आईने तीव्र विरोध दर्शवला आहे. “आंदेकर टोळीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत, त्यांना उमेदवारी देऊ नका.” जर त्यांना उमेदवारी दिली तर मी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करेन, असा इशारा बंडू आंदेकर याची मुलगी आणि मृत आयुष कोमकरची आई हिने अजित पवारांना दिला होता. मात्र, या आर्त हाकेकडे दुर्लक्ष करत अजित पवारांच्या पक्षाने आंदेकर कुटुंबातील दोघींना प्रभाग क्रमांक २३ मधून निवडणुकीसाठी तिकीट दिले.
दुसरीकडे, गज्या मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकीट देण्यात आले आहे. त्या प्रभाग क्रमांक 10 मधून अधिकृत उमेदवार असतील. त्यांना पक्षाने एबी फॉर्मही दिला आहे. जयश्री मारणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गजा मारणे सध्या कोथरूडमधील एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याप्रकरणी तुरुंगात बंदिस्त आहे. हा दुचाकीस्वार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करत होता. त्याला गजा मारणे याच्या टोळीने बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गजा मारणे याच्यासह त्याच्या काही सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती.

