सोनूच्या गाण्याचा फिव्हर सध्या सर्वांनाच चढलेला आहे. शाळेच्या वर्गापासून कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत आणि मीडियाच्या स्टुडिओपासून सरकारी कार्यालयापर्यंत सर्वत्र या सोनूचीच चर्चा आहे. सोनूच्या गाण्याची वेगवेगळी रुपंही बघायला मिळत आहेत. यात आता भर पडणार आहे ती मालवणी रुपाची पण यात भरवश्याचा प्रश्न सोनूला नाही तर गाववाल्यांना विचारला आहे. आणि हे गाववाले आहेत ‘गाव गाता गजाली’ या झी मराठीवरील आगामी मालिकेतील गावकरी. मालवणातील गजालीची धम्माल या मालिकेतून बघायला मिळणार आहे. याच मालिकेच्या प्रमोशनचा भाग म्हणून हा खास व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. ज्यात मालिकेत एक महत्त्वाचं पात्र साकारणारा प्रल्हाद कुडतरकर हा भरवश्याचा प्रश्न विचारतोय आणि बाकी गावकरी त्याला साथ देतायत. प्रल्हादला आपण यापूर्वी रात्रीस खेळ चाले या मालिकेत पांडू्च्या भूमिकेत बघितलं होतं. याही मालिकेत तो एका खास भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. याशिवाय या व्हिडीयोमध्ये प्रसिद्ध विनोदी अभिनेता दिगंबर नाईक, भरत सावले, किशोर रावराणे आणि इतर कलाकार हे प्रल्हादला साथ देतायत. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीयोने धुमाकुळ घातला असून गाववाल्यांसाठीची ही मालवणी विनंती चाहत्यांना आवडत आहे.
‘गाव गाता गजाली’ ही मालिका येत्या २ ऑगस्टपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.