पुणे :
आहार विहारातील चुकीच्या बदलामुळे विकार तयार होत असून, गोळ्या – औषधांनी त्यापासून तात्पुरती सुटका होत असली तरी संपूर्ण विकारमुक्त औषधांशिवाय जीवन जगण्यासाठी “निसर्गोपचाराची’ कास “धरावी’, असे आवाहन “नेचर क्युअर’ संस्थेच्या संचालक डॉ. सोनाली घोंगडे यांनी केले.
वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे शुक्रवारी दुपारी आयोजित या व्याख्यानात त्या बोलत होत्या.
निसर्गातील घटक आणि पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीराला निसर्गच आवाक्यात ठेवतो. मात्र, वात, कफ, पित्त या त्रिदोषांचा समतोल बिघडला की, विकार उत्पन्न होतो. आहार-विहारातील चुकीचे मेळ, बदल घातक ठरतात. निसर्गोपचार ही अधिक दूरगामी उपयुक्त उपचारपद्धती असून, तिचा अंगीकार केला पाहिजे.
चुकीच्या जीवनशैलीने छोटे आजार उत्पन्न होतात, त्याकडे दुर्लक्ष केले, तर मोठे आजार होतात, मुळात, आजार होऊच नये, अशी दिनचर्या, आहाराचे वेळापत्रक, व्यायाम आखणे शक्य आहे. निसर्गोपचार केंद्रात काही-दिवस जाऊन शरीरशुद्ध करून परत घरी ते बिघडविण्यापेक्षा आपले घर किचन, हेच निसर्गोपचार केंद्र कसे होेईल, याकडे लक्ष दिले पाहिजे.
योग्य आहार हेच औषध म्हणून गुणकारी ठरते. चांगल्या व्यायामाला आहाराची जोड द्यावी. आठवड्यातून एकदा लंघन करून फळे, भाज्यांचे रस, आवळा रस पिऊन शरीर शुद्धी करावी. सकाळी कडधान्ये, फळे, भाज्या, सुक्या मेव्याची न्याहारी करावी. तुळस, लवंग, दालचिनी उकळून केलेला पावडर विरहित चहा प्यावा. लिंबू पाणी, मध पाणीद्वारे दररोज शरीराची अंतर्गत सफाई करावी. हातसडीचा तांदूळ ,न चाळलेले गव्हाचे पीठ,भाकरी आहारात असावे आणि मांसाहार टाळावा, अशा टीप्स ही त्यांनी दिल्या.
मातीचा लेप, कटी स्नान, एनिमा, शेक,लपेट असे निसर्गोपचारही सांगितले.
१०,११ डिसेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून नोंदणीसाठी ९०२८२३२४४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेने केले आहे

