‘टाटा सॅाल्ट कल का भारत है’ आणि ‘क्लोज अप पास आओ ना’ या प्रसिद्ध जिंगल्स तसेच ‘दिल्लीबेल्ली, फुक्रे’, ‘हंटर’, ‘रामण राघव २.०’ या सारख्या अनेक हिंदी चित्रपटातील गीतांना स्वरसाज देणाऱ्या गायिका सोना मोहपात्रा यांनी आगामी घाट या मराठी सिनेमातील भक्तीमय गीत नुकतेच स्वरबद्ध केलं आहे. घाट चित्रपटाची निर्मिती सचिन जरे यांची असून दिग्दर्शन राज गोरडे यांचं आहे. एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा घाट हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
घुमला गजर आभाळी
ज्ञानराज माझी माऊली
ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पावली
ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली
असे बोल असलेले हे गीत वैभव देशमुख यांनी लिहिले असून रोहित नागभिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. माझ्या मनाला स्पर्शून गेलेलं हे भावगीत प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास व्यक्त करताना मराठीत गाण्याचा अनुभव माझ्यासाठी नेहमीच चांगला राहिला असल्याचं ही सोना मोहपात्रा आवर्जून सांगतात. या गाण्याच्या निमित्ताने गायिका सोना मोहपात्रा यांच्यासोबत काम करायला मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना माऊलीचा हा गजर म्हणजे माऊलीची सेवाच असल्याचं संगीतकार रोहित नागभिडे सांगतात.
आयुष्याची अनाकलनीय आव्हाने आणि घटनांकडे किती वेगवेगळ्या बाजूने बघता येते याचा वेध घाट चित्रपटातून घेण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा–पटकथा–संवाद राज गोरडे यांचे आहेत. छायांकन अमोल गोळे तर संकलन सागर वंजारी यांचं आहे. प्रोडक्शन मॅनेजर विनायक पाटील आहेत.