सोलापूर – प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि हागणदारीमुक्त गाव करण्याच्या अतिरेकापोटी सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावात उघड्यावर शौचास बसलेल्या महिलांच्या गळ्यात फुलांचे हार घालून फोटो सेशन करण्याचा ‘संताप जनक प्रताप’ सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड याने केला आहे. हे केल्यानंतर प्रसिद्धीच्या हव्यासाने या महाभागाने हे फोटो सोलापूरमधील पत्रकारांच्या व्हाॅटसअॅप ग्रुपवर पाठविल्याचा आरोप होतो आहे .कमजोर महिलांची अब्रू वेशीवर टांगण्याचा प्रताप करणाऱ्या यामहाभागावर तातडीने मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करून त्याला धडा शिकवावा अशी मागणी होते आहे .
दरम्यान डॉ. राजेंद्र भारुड यांनी याप्रकरणी असा खुलासा काही माध्यमांकडे केला आहे कि ,हे फोटो कुणालाही पाठवू नका, असे मी सांगितले होते. ते कुणी काढले, व्हायरल कुणी केले मला माहीत नाही. त्या महिलांचा सत्कार आम्ही केलेला नाही तर गावातीलच बचत गटाच्या महिलांना करायला लावला आहे. फोटोसेशन चुकीचे आहे, असे माझे व्यक्तीगत मत आहे.
डाॅ. राजेंद्र भारूड नावाचा हा सीईओ ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी सांगोला तालुक्यांतील चिकमहुद येथे मुक्कामी गेला होता . सायंकाळी कलापथकाचा कार्यक्रम संपवून ग्राम सभेत चिकमहुद गावाला त्याने स्वच्छतेचे धडे दिले.. ग्रामपंचायती मध्ये बैठक मारून तिथेच सतरंजी टाकून मुक्काम करण्याचा डाॅ. भारूड याने निर्धारजाहीर केला . परंतू, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गाव हागणदारी मुक्त करण्याचा शब्द दिल्या नंतर त्याने नंतर एका नवीन वास्तूमध्ये मुक्काम केला.
पहाटे पाच वाजता सिईओ डाॅ. भारूड आपले सहकारी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सचिन सोनवणे, शंकर बंडगर यांना सोबत घेऊन ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आले. तिथे महिला बचत गटांची टीम घेऊन गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे हजर होत्या. डाॅ. भारूड याने आदल्या दिवशी गावातील सर्व हागणदारी ची ठिकाणे माहिती करून घेतली होती. मळ्याच्या वाटेवरील भागात तिघांना उघड्यावर शौचालयास जाताना तंबी देणेत आली. फुलांचे हार घालून त्यांचे ‘स्वागत’ करण्यात आले.
आयएएस अधिकारी स्वच्छतेच्या कामासाठी गावात फिरत आहेत म्हटल्यावर गावातील तरूण, बचत गटाच्या महिला सिईओ समवेत गुडमाॅर्निग पथकान सहभागी झाल्या. मार्गावरून जात असताना बाॅडीगार्डचा शिट्टीचा आवाज एेकून उघड्यावर शौचास जाणारेंची पळता भुई थोडी झाली होती. हलगी वादकास सोबत घेवून ५० युवकांसह व महिला बचतगट सदस्यांसह गावाची दोन किलोमिटरची शिवार पायी फेरी डाॅ. भारुड ने केली.याच दरम्यान उघड्यावर शौचाला बसलेल्या काही महिलांना उठवून त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांचा ‘सत्कार’ करण्याचा आततायीपणा डाॅ. भारुडने केला. त्यावेळी फोटोही काढण्यात आले. हे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले होते. हे फोटो प्रेसनोट सह सोलापूरमधील पत्रकारांच्या व्हाॅट्स्अॅप ग्रुपवर पाठवण्यात आल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीला आला.उघड्यावर शौचाला बसणे ही या महिलांची चूक आहे कि आणखी काही मजबुरी आहे हा भाग वेगळा पण त्यांचे फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर टाकणे हे चुकीचे असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. स्वच्छता जितकी महत्त्वाची आहे शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हे देखील महत्त्वाचे आहे. मात्र, त्याकडे डोळेझाक करत महिलांचा आशा प्रकारे अपमान केला गेल्याने लोकांमध्ये संताप उसळला आहे.पोलिस गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींच्या चेहेऱ्यावर काळे कापड घालतात. इथे मात्र ग्रामीण भागातल्या महिलांना सुविधांअभावी उघड्यावर शौचाला बसावे लागते त्याची शिक्षा म्हणून त्यांचे हार घातलेले फोटो सोशल मिडियावर टाकून त्यांची अब्रू वेशीवर टांगण्याचे प्रकार याने केले आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी होते आहे .

