पुणेः केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव
गगनाला भिडले आहेत, अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीही सर्वसामान्यांच्या
आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दूध, साखर, डाळी, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचे
दरही भरमसाठ वाढले आहेत. ऐन सणासुदीला झालेल्या या महागाईमुळे
सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात ठेवण्यात केंद्र
व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. दुसरीकडे नोटबंदी, जीएसटीच्या
बडग्यामुळे व्यापारी-व्यावसायिक वर्गही त्रस्त झाला आहे. अच्छे दिनाचे स्वप्न
दाखवून सत्तेत आलेले सरकार केवळ बड्या धनदांडग्यांसाठी फायद्याची धोरणे
राबवित असून आम आदमीचा मात्र तोटा होत आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या
संसाराचे आर्थिक गणित कोसळ्त आहे, अशी टीका सोशलिस्ट पार्टी (इंडिया)चे
पुणे शहर अध्यक्ष: अॅड. संतोष म्हस्के यांनी केली.
सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ आणि महागाई रोखण्यासाठी
तातडीने उपाययोजना कराव्या, या मागणीसाठी सोशलिस्ट पार्टी (इंडिया)
पक्षातर्फे शुक्रवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी सायं. 7 वाजता दीप बंगला चौक(बँक
महर्षी चि. वि. जोग चौक) येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी
सोशलिस्ट पार्टी (इंडिया)चे कार्यकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी, वर्षा सपकाळ, संतोष
पवार, मंगल निकम, शकुंतला भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सोशलिस्ट पार्टी (इंडिया) चे सेक्रेटरी श्रीकृष्ण कुलकर्णी म्हणाले की,
आपल्या कराचा पैसासुद्धा आपल्यासाठी खर्च न करता उद्योगपतींची पोटं
भरायला वापरला जात आहे. एका बाजूला आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सेवा
कर वाढवले जात आहे आणि दुसरीकडे उद्योगपतींना कॉपोरेट कर कमी केला
आहे. शिक्षण, रेशन, औषधांवर खर्च कमी केला आहे, आणि उद्योगपतींना ५.७५
लाख कोटींचा कर माफ केला आहे! या सरकारला जाब विचारलाच पाहिजे!
महागाई विरुद्ध आपण सर्वांनी एक मोठी चळवळ उभी केली पाहिजे अशी
मागणीही त्यांनी केली.