नवभारत निर्मितीच्या वतीने ‘नृत्योत्सव’-‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची जनजागृती
भरतनाट्यम्, कथक, कुचिपुडी, ओडिसीचे एकत्रित आविष्कार
१८ संस्थांमधील ७५० अभिजात नृत्य कलाकारांचा सहभाग
पुणे- नवभारत निर्मिती संकल्प-सिध्दीच्या वतीने शहरातील ७५० अभिजात नृत्य कलाकारांच्या साधनेचा आविष्कार असलेला नृत्योत्सव शनिवारी (ता. ७ एप्रिल) सायंकाळी साडेपाच वाजता न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेच्या मैदानावर साजरा केला जाणार आहे. या कार्यक‘माद्वारे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाची जनजागृती करण्यात येणार आहे. ही माहिती समन्वयक योगेश गोगावले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.
भरतनाट्यम्, कथक, कुचिपुडी, ओडिसी या भारतीय शास्त्रीय नृत्य शैलींचे सादरीकरण करण्यात येणार आहे. गुरु मनिषा साठे, सुचेता चापेकर, गुरु शमा भाटे, नीलिमा अध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अठरा नृत्य संस्थांतील विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
नृत्यभारती, मनीषा नृत्यालय, नादरुप, कलावर्धिनी, नुपूरनाद, आर्टिट्यूड, शांभवीज, कलासक्त, नृत्यधाम, नृत्यप्रेरणा, सुनाट्य अमृतवर्षा, नृत्योन्मेष, चिदंबरम, नृत्यप्रिया आणि ओडिसी या संस्थांचा सहभाग आहे. हा कार्यक‘म सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
नृत्य ही सर्वसमावेशक कला आहे. संगीताचे दृश्य रूप म्हणजे नृत्य, चलत शिल्प म्हणजे नृत्य आणि कायिक अभिनय म्हणजे नृत्य. सर्व भारतीय नृत्यशैलींना प्राचीन परंपरा आहे. याचाच अर्थ त्यात जितक्या मूलगामी आहेत तितक्याच त्या नवतेकडे झेपाविणार्याही आहेत. म्हणूनच सर्व चांगल्या-वाईटाला सामावत त्या चिरकाल अबाधित राहिल्या आहेत.
भारतात नऊ वेगवेगळ्या नृत्यशैली आहेत. भरतनाट्यम्, कथक, कथकली, ओडिसी, कुचिपुडी, मणिपुरी, मोहिनीअट्टम, सत्रिय आणि झाऊ. नाट्यशास्त्रातील मार्गी नृत्य ज्या ज्या प्रदेशात स्थिरावले त्या त्या प्रदेशाची भाषा, संगीत आणि त्याच्याशी निगडील असलेली देहबोली या देशी शैलींनी अंगिकारली. जरी या शैलीची सादरीकरणाची पध्दत आणि दृश्य रुप वेगळे असले तरी आत्मा हा भक्ती हाच राहिला आहे. म्हणूनच यांना भगिनी शैली असे म्हटले जाते.
पुणे शहरात गेली पाचहून अधिक दशके शास्त्रीय नृत्याचा प्रचार, प्रसार होतो आहे. पंडिता गुरु रोहिणी भाटे यांनी पुणेकर रसिकांना कथक या उत्तर हिंदुस्थानी शैलीची ओळख करून देऊन ती पुण्यात रुजवली. गुरु शमा भाटे, गुरु मनिषा साठे यांच्या सारखे दिग्गज कलाकार आजही या कलेचा प्रचार, प्रसार करीत आहेत. गुरु सुचेता चापेकर, गुरु माणिक अंबिके यांच्यासार‘या कलाकारांमुळे भरतनाट्यम् ही दक्षिणी शैली पुण्यात रुजली वाढली व लोकप्रिय झाली. याबरोबरच ओडिसी आणि कुचिपुडी याही शैलींचा प्रसार आता पुण्यात होत आहे.
श्री गोगावले म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टी राजकारणाकडे एका विकसित दृष्टिकोनातून पाहू इच्छिते. राजकीय पक्ष हा निवडणुकींपुरता मर्यादित नाही. समाज जीवनाचे प्रत्येक अंग प्रोत्साहित करणे, त्यांना बळ देणे आणि एक परिपूर्ण समाजाची निर्मिती हा हेतू नवभारत निर्मितीचा अविभाज्य भाग आहे. पुणे शहर हे परिपूर्ण शहर आहे. विविध कला याचे हे मूळ स्थान आहे. भविष्यकाळात पुण्याच्या इतिहासात देशाचे नेतृत्व करणारे पुणे शहर सर्वांगाने प्रोत्साहित झाले तर विविध क्षेत्राचे नेतृत्व पुणेकर करतील असा विश्वास या भारतीय नृत्य कलेच्या सादरीकरणामागील हेतू आहे.’ सांस्कृतिक विभागाच्या वतीने अजय धोंगडे, उदय जोशी, प्रा. विनायक आंबेकर, उमेश गायकवाड, दीलीप वेडे-पाटील, समन्वयक गणेश कळमकर, शशीकला मेंगडे, दीपक पोटे, राजेश येनपुरे यांनी संयोजन केले.