पुणे-सध्या महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. पाककला तर त्यांच्या हातचा मळ असेच म्हणावे लागेल. सध्याच्या फास्ट फुडच्या जमान्यात मुलांना पौष्टिक खाऊ देताना खरोखरीस महिलांना चव व पोषण मुल्य यांचा मेळ साधत पाककलेचे कौशल्य दाखवावे लागते. या दृष्टीनेच महिला दिनाचे औचित्य साधून न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरात महिला पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. एकूण ५० पालकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. परिक्षक म्हणून डाएटिशिअन सौ. वरदा सहस्त्रबुध्दे व पाककलातज्ञ सौ. लिना पाटकर यांनी काम बघितले. या स्पर्धेची नियोजनबद्ध आखणी करत असताना मा. मुख्याध्यापिका सौ. अमिताताई दाते यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.