पुणे, ता. २५ : एकोणिसाव्या शतकात महादेव बल्लाळ नामजोशी यांनी देशात सर्वप्रथम उद्योगांची उभारणी करून रोजगार निर्मिती केली. त्यांच्या विचारांत उद्योगांचा वैचारिक पाया रचला गेला. त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे मत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
‘विद्यावैभव प्रकाशना’तर्फे प्रकाशित आणि डॉ. जगदीश लांजेकर यांनी लिहिलेल्या ‘उद्योग धोरणी महादेव बल्लाळ जोशी’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना निंबाळकर बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे (डीईएस) अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, प्रकाशक बकुल पराडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
टिळक म्हणाले, ‘महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, आगरकर, भांडारकर यांनी सामाजिक क्षेत्रातील मूलभूत कार्याची पुण्यातून सुरूवात केली. त्याच वेळी नामजोशी यांनी उद्योग उभारणीकरीता प्रचार आणि प्रसार केला. त्यांचे विचार पुढील पीढ्यांना मार्गदर्शन करणारे ठरले.’
डॉ. कुंटे म्हणाले, ‘नामजोशी यांच्या कार्याची दखल घेऊन आम्ही डीईएसमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे आमच्या शैक्षणिक संस्थेतील एकही विद्यार्थी बेरोजगार राहणार नाही असा विश्वास वाटतो. नामजोशी यांची परंपरा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत.’ लेखक डॉ. लांजेकर यांनी प्रास्ताविक आणि प्रकाशक पराडकर यांनी आभार प्रदर्शन केले.

