पुणे – ‘मुक्तछंद’ या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणार्या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ‘स्व. प्रमोदजी महाजन स्मृति पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि ‘तीन तलाक’साठी यशस्वी लढा देणार्या शायरा बानो यांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी कळविली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते येत्या रविवारी (ता. २९ ऑक्टोबर) दुपारी साडेचार वाजता कोथरुडच्या ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृहा’त पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. खासदार अनिल शिरोळे, खासदार पूनम महाजन, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अनुपम खेर यांची नुकतीच ‘फील्म ऍण्ड टेलिव्हिजन ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी निवड झाली आहे. श्री. खेर यांनी ३५ वर्षांहून अधिक काळ चित्रपट आणि कला क्षेत्रासाठी बहुमूल्य योगदान दिले आहे. त्याचा बहुमान करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
‘तीन तलाक’ प्रथेविरोधात उत्तराखंडमधील शायरा बानो यांनी मूळ याचिका दाखल केली होती. ‘तीन तलाक’ ही घटस्फोटाची पध्दत मुस्लिम महिलांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारी आहे. आकस्मिक, एकाकी व बदलता न येणारी ही पध्दत घटनाबाह्य ठरवावी यासाठी शायरा बानो यांनी यशस्वी लढा दिला. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, सरकारी वकील ऍड उज्ज्वल निकम, ‘सीताराम बुवा चॅरिटेबल ट्रस्ट’चे विकास वालवलकर, शहीद जवान चंद्रकांत गलांडे यांच्या वीरपत्नी निशा गलांडे आदी मान्यवरांना यापूर्वी ‘प्रमोद महाजन स्मृति पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे.
अनुपम खेर, शायरा बानो प्रमोद महाजन पुरस्काराचे मानकरी
Date: