पुणे, ता. ९ ः शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना किमान एकतरी व्यावसायिक कौशल्य विकसित करता यावे या उद्देशाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) वतीने सहा खासगी आयटीआय सुरू करणार असल्याची घोषणा सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी केली.
डीईएसच्या संस्थापक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात डॉ. कुंटे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. वरिष्ठ अधिव्या‘याता ऍड विद्याधर शिंत्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोसायटीचे उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, नवलमल ङ्गिरोदिया विधी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऍड. नितीन आपटे, प्राचार्या डॉ. रोहिणी होनप यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
डॉ. कुंटे पुढे म्हणाले, ‘नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा नुकताच जाहीर झाला आहे. त्यावर चर्चा ही सुरू आहेत. आराखड्यात नमूद केलेल्या विविध विषयांवर डीईएसने खूप आधीपासून तयारी सुरू केली आहे. बेरोजगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहाता येईल अशाप्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक‘मांची समाजाकडून मागणी होत आहे. समाजाच्या संस्थेकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विविध योजना सुरू करणार आहोत.’
ऍड शिंत्रे म्हणाले, ‘आपण प्रयत्न केला तर यश मिळते. परंतु ते दर वेळेला मिळेलच असे नाही. परंतु अपयशाने खचून जाण्याची आवश्यकता नाही. अपयश पचविण्याची शक्ती तेवढीच महत्त्वाची असते.’
कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांनी अहवाल वाचन केले. डॉ. रोहिणी होनप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. जगदीश लांजेकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन केले. डॉ. अनघा बलदोटा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रताप साळुंके यांनी आभार मानले.
‘डीईएस’ सुरू करणार सहा आयटीआय डॉ. शरद कुंटे यांची माहिती
Date:

