पुणे-
लोहगाव परिसरातील हिंदुस्थान पेट्रोलियमची पाईप लाईन फोडून 5 हजार लिटर पेट्रोल चोरण्यात आले होते. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात पंधरा दिवसांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला होता. या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने दोन पोलीस अधिकाऱ्यांसह सहा जणांना काल रात्री उशीरा अटक केली.
पुणे ग्रामीणचे पोलीस उप निरीक्षक सुहास ठोंबरे, चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक रविंद्र भीडे यांच्यासह इस्माईल पिरमोहम्मद शेख (वय-60, रा.अण्णासाहेब मगर नगर, चिंचवड, पुणे), पोलीस शिपाई अविनाश शिवशरण, मोतीराम शंकर पवार (वय-30, रा.टेल्को रोड, गणेश नगर , भोसरी, पुणे) आणि दिनेश अनिल पवार (वय-21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी पोलीस कर्मचारी ठोंबरे, भीडे आणि शेख यांच्या सांगण्यावरून शंकर पवार व दिनेश पवार यांनी पेट्रोल वाहून नेणा-या पाईपच्या ठिकाणी खोदकाम केले आणि पाईपवर वॉल बसवला. त्यानंतर त्यांनी टँकरद्वारे डिझेलची चोरी करत त्याची विक्री केली. यासाठी भीडे यांनी त्यांना 55 हजार रुपये दिले. आरोपींनी अशाप्रकारे 5 हजार पेट्रोल लिटर चोरी केले होते.
पंधरा दिवसांपूर्वी लोहगाव येथील तालेरा फार्म हाऊसच्या हद्दीत मुंबईहून लोणीकडे जाणारी पाईप लाईन फोडून पाच हजार लिटर पेट्रोलची चोरी करण्यात आली होती. सोलापूरमध्ये प्रेशर कमी येत असल्याने कुठेतरी पाईप लाईन फुटल्याचा संशय आला होता. त्यावेळी तपासणी केली असता हा पेट्रोल चोरीचा प्रकार समोर आला होता. दोन महिन्यांपूर्वी देहुरोड परिसरात देखील अशाच प्रकारे पेट्रोल चोरीचा प्रकार घडला होता. यामध्ये चार परप्रांतीयांना अटक करण्यात आली होती.

