मराठा साम्राज्य स्थापन करण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ यांचा सिंहाचा वाटा आहे. हिंदुस्थानातील निजाम, हैदर मोगल, सिद्दी या सारख्या परकीय महासत्तांना मात देणारा अजिंक्य योद्धा म्हणजे ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’. मराठी मुलखात आत्मविश्र्वास व स्वराज्यनिष्ठा निर्माण करणारा ‘संस्थापक पेशवा’! दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक मारणारा एकमेव मराठी लढवय्या म्हणजे ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’. अशा या महापराक्रमी योद्ध्याची शौर्यगाथा आता ‘अजिंक्य योद्धा’ या नाट्यरूपाने आपल्या समोर येणार आहे.
संजय ह. पांडे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या तसेच पंजाब टॅाकीजची निर्मिती असलेल्या ‘अजिंक्य योद्धा श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ या महानाटय़ाला लवकरच प्रारंभ होणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. वरुणा मदनलाल राणा दिग्दर्शित आणि प्रताप गंगावणे लिखित ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे हे ‘महानाटय़’ आहे. या महानाट्यातून ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांचा इतिहास आणि जीवनचरित्र उलगडलं जाणार आहे. अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात या पेशव्याने दैदिप्यमान आणि गौरवशाली इतिहास घडवला. युद्ध कौशल्य, लष्करी गुण, मुत्सद्दीपण, प्रशासकीय कौशल्य यांचा सुरेख मिलाफ असलेले बाजीरावांचे व्यक्तिमत्व व त्यांचा इतिहास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा या उद्देशाने या महानाट्याची निर्मिती करण्यात येत आहे.
पंजाब टॅाकीज निर्मित ‘अजिंक्य योद्धा श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ या महानाट्यासाठी सहाय्यक दिग्दर्शन व कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी अभय सोडये यांनी सांभाळली आहे. या महानाट्यातील गाणी गायक आदर्श शिंदे, नंदेश उमप, वैशाली माडे यांनी गायली आहेत. आदर्श शिंदे यांनी गायलेलं शीर्षकगीत अप्रतिम झालेले आहे. संगीत दिग्दर्शक आदि रामचंद्र, आणि संगीत संयोजन विनीत देशपांडे यांचे असून वेशभूषा पौर्णिमा ओक यांची आहे. सूत्रधार योगेश मोरे, कुणाल मुळये, रुपेश परब आहेत. उमेश तावडे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. अतिशय भव्य स्वरुपात ‘अजिंक्य योद्धा श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ या महानाट्याचे प्रयोग सादर होणार असून प्रेक्षकांसाठी हा अविस्मरणीय अनुभव ठरेल हे नक्की.