पुणे- भाजप आणि राष्ट्रवादीची आतून छुपी युती असल्याचा आरोप आज येथे शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केला तर पुण्या आणि पिंपरीत निव्वळ चिखल फेकीचे राजकारण होते , विकासाची स्पर्धा होत नाही अशी खंत अभिनेता डॉ. अमोल कोल्हे, यांनी व्यक्त केली महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे शहराचा शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात आला. याचे प्रकाशन आज राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार निलम गोऱ्हे, पुणे जिल्हा प्रमुख डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री शशिकांत सुतार, पुणे शहर प्रमुख विनायक निम्हण ,रमेश बोडके, सचिन तावरे, राजाभाऊ रायकर,दिलीप गालिंदे,यांच्या हस्ते करण्यात आले.
येत्या पाच वर्षात ठराविक दिवशी पुणेकरांना मोफत बससेवा देण्याचा मानस वचननाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. तसेच येथील नागरिकांसाठी मोफत आरोग्यसेवा त्याचबरोबर पाणीपट्टी दरात वाढ करणार नसल्याचाही शब्द शिवसेनेने दिला आहे. शहरातील रस्त्यांचा विकास करणे, उड्डाणपुलावर भर दिला जाणार आहे. पुणे शहरात वायफाय यंत्रणा उभारण्यासाठीही प्रयत्न केला जाणार आहे.
शिवसेनेच्या वचननाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे
पुणे शहराच्या मेट्रोला गती देण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र विभाग स्थापन करणार.
२४ तास समान पाणीपुरवठा देण्यावर अधिक भर राहणार. पाणीपट्टीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही.
प्रत्येक विधानसभानिहाय्य एक सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार.
झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करणार असून चांगली घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ केशरी रंगाची शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना हेल्थ कार्डच्या माध्यमातून आरोग्य सुविधा दिली जाणार.
जुन्या वाड्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला असून त्या पार्श्वभूमीवर पुनर्वसन केले जाणार आहे. यांच्या पुर्णबांधणीसाठी महापालिकेच्या वतीने एसपीव्ही ची स्थापन करण्यात येणार आहे.
मागील कित्येक वर्षांपासून पुणे शहरातील नागरिकांना कचरा समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्या दृष्टीने प्रत्येक प्रभागात कचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
प्लॅस्टिक पिशव्याची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हे लक्षात घेता पुणे शहर प्लॅस्टिक मुक्त करणार.
महिलांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी राजामाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना राबविण्यात येणार.
#ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषध उपलब्ध करून देणार आणि प्रत्येक प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर उभारणार.