महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेचा (एमटीपीए) ४२ वा वर्धापन दिन उत्साहात
पुणे : “छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कारकिर्दीतील २५ वर्षे म्हणजे सर्वाधिक काळ अर्थकारण केले. स्वराज्यातील शेतकरी, मजूर, व्यापारी अशा प्रत्येक गरिबातील गरीब घटकाचे कल्याण होईल, अशी अर्थनीती त्यांनी अवलंबली. आजच्या काळात शिवरायांच्या या अर्थनीतीची आत्यंतिक आवश्यकता आहे,” असे मत लेखक व शिवचरित्र अभ्यासक राहुल उर्फ रायबा नलावडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या (महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन – एमटीपीए) ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रायबा नलावडे बोलत होते. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने रविवारी शिवाजी रस्त्यावरील ‘एमटीपीए’च्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच संस्थेचे ज्येष्ठ सदस्य सीए जी. वाय. लिमये यांना ‘कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष बी. एम. शर्मा, अनिल वखारिया, नरेंद्र सोनवणे, ‘एमटीपीए’चे अध्यक्ष मनोज चितळीकर, उपाध्यक्ष श्रीपाद बेदरकर, सचिव ज्ञानेश्वर नरवडे, स्वप्नील शहा, अमोल शहा, पदाधिकारी अनुरुद्र चव्हाण, अश्विनी बिडकर, अश्विनी जाधव, ऍड. उमेश दांगट आदी उपस्थित होते.
रायबा नलावडे म्हणाले, “शिवाजी महाराज हे उत्तम अर्थकारणी होते. स्वराज्यातील प्रत्येकाचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या. आज वंचित घटकातील लोक, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे. गरीब-श्रीमंत ही दरी घालवण्यासाठी शिवाजी महाराजांनी दिलेल्या अर्थनीतीवर चालण्याची आवश्यकता आहे.”
अमित गायकवाड म्हणाले, “कर सल्लागारांच्या संस्थेत शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला, याचा आनंद आहे. शिवरायांची अर्थनीती दिशादर्शक होती. सतराव्या शतकात त्यांनी केलेले अर्थकारण अभ्यासले, तर सर्वांचा विचार त्यात दिसतो. राज्य चालवण्यासाठी सैन्याइतकीच पैशांची गरज असते, हे त्यांनी अधोरेखित केले. कर सल्लागारांनी त्यांच्या अर्थनीतीचा अभ्यास करून आजच्या काळात ती राबविता येईल का, याचा विचार करावा.”
सूत्रसंचालन प्रणव सेठ यांनी केले. प्रास्ताविक मनोज चितळीकर यांनी केले. श्रीपाद बेदरकर यांनी आभार मानले.
स्वराज्यातील प्रत्येकासाठी कल्याणकारीअशी शिवरायांची अर्थनीती : रायबा नलावडे
Date:

