पुणे : “राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात. आगामी निवडणुकांत राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेनेने पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची आवश्यकता आहे. भाजप व रिपब्लिकन पक्ष एकत्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता येणे अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेने आमच्यासोबत आले पाहिजे,” असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे रामदास आठवले यांच्या हस्ते सुपूर्द केल्यानंतर, तसेच उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर आठवले पत्रकारांशी बोलत होते. प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, गटनेते गणेश बीडकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. डी. शेवाळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, ऍड. आयुब शेख, शैलेश चव्हाण, नगरसेविका फरझाना शेख, हिमाली कांबळे, असित गांगुर्डे, बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड, रोहिदास गायकवाड, निलेश आल्हाट, संगीता आठवले, शशिकला वाघमारे आदी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “पुण्याचा विस्तार होत असून, ४० लाखाच्या पुढे लोकसंख्या गेली आहे. त्यामुळे पालिकेचे विभाजन करून दोन पालिका अस्तित्वात यायला हव्यात. पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करेन. ‘गो कोरोना गो’ म्हणत होतो. मात्र, मलाच कोरोना झाल्याने मी आता ‘नो कोरोना नो’ म्हणतो. कोरोनाची परिस्थिती हाताळताना पुण्याचे महापौर, उपमहापौर व पालिका प्रशासनाने चांगली कामगिरी केली आहे. मोठ्या प्रमाणात योजना आखल्या. बेड, ऑक्सिजन, औषधे मिळवून दिले, रुग्णालय उभे केले. आता तिसरी लाट आली, तरी सक्षम यंत्रणा उभी केली आहे. राज्यांना मदत गेली आहे, मुख्यमंत्र्यैंसोबत बैठका झाल्या. त्यामुळे तिसऱ्या लाटेवर आपण मात करू शकतो.”
“पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत. त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मात्र, चर्चेतून ती नाराजी लवकरच दूर होईल. जातीनिहाय जनगणना करण्याबाबत मी सकारात्मक असून, त्यातून अनेक जातींना आरक्षण नेमके कसे द्यावे, हे निश्चित करणे सोयीचे होईल व सर्वाना न्याय देता येईल. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्याला अधिकार द्यावेत, कायद्यात बदल करावेत. ओबीसींच्या २५ टक्केमध्ये वर्गावारी करून, प्रत्येकास ९ टक्के आरक्षण द्यावे, कोणत्या जाती कोणत्या गटात टाकावेत याचा विचार करावा. आर्थिक दुर्बलांना १० टक्के शिक्षण आणि नोकरीचे आरक्षण मिळेल,” असेही रामदास आठवले यांनी सांगितले.
“रिपब्लिकन पक्षाचे आता पालिकेत पाच नगरसेवक आहेत. तीन उपमहापौर झाले आहेत. स्वबळावर निवडणूक लढून हे यश मिळवणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही भविष्यातही भाजपसोबतच राहणार असून, नगरसेवकांची संख्या वाढवणार आहोत. विधानसभेलाही आम्हाला भाजपच्या साथीने चांगल्या जागा मिळतील,” असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
पुणे महापालिकेचे करा विभाजन
नव्याने समावेश झालेल्या 23 गावांच्या समावेशामुळे पुण्याचा विस्तार होत असून, ४० लाखाच्या पुढे लोकसंख्या गेली आहे. त्यामुळे पालिकेचे विभाजन करून दोन पालिका अस्तित्वात यायला हव्यात. पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करेन. असे असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

