मुंबई -शिवसेना नेते सुधीर जोशी यांचं आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी होते. ते दीर्घकाळापासून आजारी होते. त्यातूनच आज मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं.
सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी बाळासाहेबांसोबत उल्लेखनीय काम केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत काम करत असलेले सुधीर जोशी १९७३ मध्ये मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री ही पदेही त्यांनी भूषवली आहेत.संस्कृत व सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला’ आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेला, एकमेव शिवसेना नेता असं त्यांचं वर्णन केलं जातं. मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेबांनी सोपविली, ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे जवळचे सहकारी राहिले आहेत. सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते.

