मुंबई- महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात मी इतका बालीश मुख्यमंत्री पाहिला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.5 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी न झाल्यास शेतकऱ्यांची असहकार चळवळ सुरू करण्याचा विचार असल्याचा गर्भित इशारा शरद पवार यांनी दिला आहे .
इंग्रजी वेबसाइटवर ‘फर्स्ट पोस्ट’वर शरद पवार यांची विशेष मुलाखत प्रकाशित झाली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये झालेला घोळ हा मुख्यमंत्र्यांमुळेच असल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे.
पवार यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःची एक वेगळी यंत्रणा उभी करत आहेत. ही यंत्रणा राज्यासाठी नव्हे, तर केवळ मुख्यमंत्र्यांसाठी काम करते. कारण, मुख्यमंत्र्याचा स्वतःच्याच खात्यांवर आणि त्या खात्यामधील सनदी अधिकाऱ्यांवर विश्वास नाही.
पवार म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखालील बँका आणि सहकारी बँकांना फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांना वाटते. परंतु हा आरोप पूर्णपणे निराधार आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीसाठी पात्र खात्यांचे आकडे फुगवून सांगितल्याचा आरोप केला आहे. मग आता राष्ट्रीयीकृत बँकाही काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष चालवतात का? असा सवालही पवार यांनी केला आहे.
5 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी न झाल्यास शेतकऱ्यांची असहकार चळवळ सुरू करण्याचा विचार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा अंतिम उपाय असू शकत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के नफा देण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.