अहमदनगर- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका पत्रकाराने प्रश्न विचारताच भडकले.राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून पक्षाचे मोठे नेते पक्षाला राम-राम ठोकत आहेत. आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला. तुमचे नातेवाईक पक्षापासून दूर का जात आहेत, असा प्रश्न विचारताच शरद पवार हे संतापले. यात नातेवाईकांचा काय संबंध, नातेवाईकांचा प्रश्न आला कुठून, असे म्हणत ते पत्रकार परिषद सोडून जाऊ लागले. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराने माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली. त्यावेळी इतर पत्रकारांनी त्यांची माफी मागितली. त्यानंतर पत्रकार परिषद पुढे सुरु झाली.
शरद पवारांचे नातलग असलेले उस्मानाबादमधील नेते पद्मसिंह पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबत श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नामुळे शरद पवार भडकले. ‘इथं नातेवाईकांचा प्रश्न येतोच कुठं?, असे प्रश्न तुम्ही कसे काय विचारू शकता?, तुम्ही माफी मागा, असं म्हणत थेट निघून जाऊ लागले. पत्रकार परिषद सुरू असताना घडलेल्या या प्रसंगामुळे सगळेच चकीत झाले. राजकारणात नातेवाईकांचा संबंध आहे का? हे असं बोलायचं असेल तर मला बोलायचं नाही असं सांगत पवार जागेवरून उठले त्यानंतर इतर पत्रकारांच्या सांगण्यानंतर शरद पवार पुन्हा जागेवर बसले. त्यावेळी अशा लोकांना बोलवत जाऊ नका, ज्यांना सभ्यता नाही, यांना बोलवणार असाल तर मला बोलावू नका, आपण निघून गेलात तर बरं होईल अशा शब्दात पवारांनी आपला राग व्यक्त केला. या घटनेवरुन हे सिद्ध होते की, नेत्यांच्या गळतीमुळे राष्ट्रवादीले पडलेले खिंडार शरद पवारांच्या जिव्हारी लागले आहे.