पुणे-
कोरिओग्राफर शामक दावरच्या समरफंक अवॉर्ड शोमध्ये विजेत्यांना दाद देण्यासाठी विक्रम फडणीसने हजेरी लावली. पुण्यात यशवंतराव संकुलात शामक दावरच्या समरफंक या कार्यक्रमाच्या अवॉर्ड शोचे सादरीकरण करण्यात आले. या अवॉर्ड शोमध्ये लहान मुलांपासून तरूण मुलांपर्यंत सर्वांनीच एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स दिले. या मुलांना पुरस्कार देण्यासाठी विक्रम फडणीसने या कार्यक्रमाला हजेरी लावली. पुण्यात उत्तम डान्सर्स आहेत व त्यामुळेच समरफंकचा हा कार्यक्रम एक नंबर झाल्याचे यावेळी शामक दावरने व्यक्त केले. त्यातच विक्रम फडणीससह ह्रदयांतर सिनेमातील बालकलाकार नित्या व न्यासाही यावेळी उपस्थित होत्या. हा सिनेमा माझ्या व माझ्या अकादमीच्या अत्यंत जवळचा आहे असेही यावेळी शामकने नमूद केले. या कार्यक्रमात ह्रदयांतरचे ट्रेलरही दाखवण्यात आले. चाहत्यांनी त्याला उत्तम प्रतिसादही दिला. समरफंक सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मचा भाग असणं हे माझ्यासाठी खुप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वर्षांपासून समरफंक हा कार्यक्रम ज्या पद्धतीने होतोय, त्यामुळे कोणत्याही वयातील डान्सची आवड असणाऱ्यांना यात सहभागी होऊन आपली कलाकृती सर्वांसमोर दाखवता येत आहे. शामकला मी जवळपास 30 वर्षांपासून ओळखतो. तसेच ह्रदयांतरमध्ये त्याची छोटीशी भूमिकाही आहे व त्याच्या पूर्ण इन्स्टिट्यूटचा या सिनेमात महत्त्वाचा वाटा आहे. पुण्यात ह्रदयांतरचे पहिल्यांदा प्रमोशन माझा मित्र शामकसोबत होत आहे त्यामुळे मला खुप आनंद होत आहे, अशी भावना यावेळी विक्रम फ़डणीस याने व्यक्त केली.
विक्रमचा आगामी ह्रदयांतर हा सिनेमा 14 जुलैला प्रदर्शित होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सिनेमाच्या पूर्ण टीमचे शामकसोबत जोरदार प्रमोशन सुरू आहे.