मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ‘टीस’ टाटा सामाजिक विज्ञान संस्था या संस्थेने दिलेल्या अहवालावर पुढील कार्यवाही गतिमान करण्यासाठी तसेच केंद्र सरकारकडे करावयाची शिफारस यासाठी हा अहवाल राज्याच्या महाधिवक्त्यांकडे सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला.
उच्च न्यायालयातील याचिकेमध्ये सुयोग्य बाजु मांडण्यासह या संपूर्ण प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय समितीने घेतानाच आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजना आता धनगर समाजालाही लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, अस्तित्त्वातील आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आदिवासी विकास विभागांतर्गत सुरु असलेल्या सर्व येाजनांचा लाभ देण्यात येईल. ज्या विविध योजनांचा लाभ आदिवासी समाज बांधवांना मिळतो तोच लाभ धनगर समाजाला मिळेल. यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. टीसच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक गरज असलेल्या भागात तत्काळ शासकीय आश्रमशाळा उभारण्यात येतील. अतिदुर्गम तालुके, गावांमध्ये आदिवासी आश्रमशाळेसारख्याच समर्पित आश्रम शाळा, मॅट्रीकपूर्व आणि मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत शाळेत प्रवेश आदी सर्व योजनांचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यात राज्याच्या सहाही विभागात वसतीगृहे बांधण्यात येतील. धनगर समाजासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 हजार घरकुलांची निर्मिती करण्यात येईल. भूमीहिनांसाठी असलेल्या जमीन देण्याच्या येाजनाही धनगर समाजाला लागू करण्यात येतील. चरई- कुरण जमीन देण्यासंदर्भात वन विभागाने निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी नावात बदल करुन आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्योजकता विकास व शेळी-मेंढी विकास महामंडळ या नावाने हे महामंडळ ओळखले जाईल. यामार्फत उद्योजकता विकास, कौशल्य विकास, बिन व्याजी कर्जासंबंधीच्या योजना राबविल्या जातील. या सर्वांसाठी आवश्यक त्या निधीची तरतुदही करण्यात येईल.
# प्रत्येक विभागात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह
# मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, नामांकित शाळांमध्ये प्रवेश
# सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव
# उद्योजकता विकासासाठी महामंडळ सक्षम करणार, 10 हजार घरेही बांधणार
आदिवासी समाजाच्या योजना धनगर समाजाला लागू केल्यामुळे धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे धनगर समाजाची प्रगती होणार – पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर
धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Date:
मुख्यमंत्र्यांनी आमची फसवणूक केली असून बारामती मध्ये घोषणा केल्याप्रमाणे आम्हाला ST समाजाचे जात प्रमाणपत्र हवे आहे. –परमेश्वर केळेकर, सदस्य, धनगर आरक्षण कृती समिती
टीस संस्थेने धनगर आरक्षाणावर दिलेला अहवाल गेल्या दीड वर्षांपासून धूळखात पडला आहे. आता निवडणुकींच्या तोंडावर धनगर समाजाला अनूसुचित जमातीच्या सवलती देऊ, टीएसपीच्या सवलती देऊ, बजेटमध्ये विशेष तरतूद करु अशी गाजरं दाखवली जात आहे. बजेट आताच झालं ना? मग का तरतूद केली गेली नाही ? – विपने धनंजय मुंडे

