पुणे, शिक्षणासह परिश्रम, प्रामाणिकपणा, खिलाडूपणा, यशासह अपयशांनाही समोरे जाण्याची ताकद अशी अनेक नितीमूल्य आणि संस्कार आम्ही शाळेमध्येच शिकलो. जीवनामध्ये आज आम्ही जे काही चांगले काम केले आहे व यशस्वी बनण्याचा आमचा प्रयत्न आहे, यामध्ये सेंट व्हिन्सेंट शाळेचा वाटा खूप मोठा असल्याचे मत निवृत्त कमांडो व माजी विद्यार्थी जॉर्ज कैलाथ यांनी व्यक्त केले.
सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या शतकोत्तर-सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 150 व्या वर्षात पर्दापण केलेल्या सेंट व्हिन्सेंट शाळेने महोत्सवाची सुरूवात खास कार्यक्र माने केली. यावेळी पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, शाळेचे माजी विद्यार्थी व माजी खासदार सुरेश कलमाडी, माजी विद्यार्थी व बजाज फायनान्स्चे संजीव बजाज, डॉ. दयानंद शेट्टी, रेडीओ जॉकी संग्राम खोपडे, राष्ट्रीय टेनिसपटू नितीन किर्तने व संदीप किर्तने, बिशप व्हॅलेरीय डिसुझा, शाळेचे माजी व्हिन्सेटीयन फा.जॉर्ज केलिथ व फादर मारीओ फर्नांडिस, शाळेचे उपमुख्याध्यापक अनिश के., मुख्य समन्वयक मंजू तिवारी यांच्यासह अनेक आजी-माजी विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. सेंट व्हिन्सेंट हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर अॅन्ड्रु फर्नांडिस हस्ते मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारानंतर बोलताना निवृत्त कमांडो जॉर्ज कैलाथ म्हणाले की, शाळेमध्ये आम्ही अनेक गोष्टी शिकलो. आयुष्याच्या प्रत्येक क्षणांना सामंजस्याने आणि धैर्याने समोरे जायचे, असे संस्कार आमच्यावर शाळेनेच केले. शाळेने आमच्या आयुष्यामध्ये जे काही बदल घडविले ते आम्ही नेहमीच लक्षात ठेवले. आजही शाळा जेव्हा आम्हाला बोलावते, तेव्हा आमचे मन असंख्या भावनांनी दाटून येते.
शाळेच्या गुलाटी सभागृहामध्ये आयोजित या समारंभात निमंत्रित मान्यवरांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमही सादर करण्यात आला. शाळेच्या शिशु गटातील ते कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्यसंगीत व समूहगान सादर केले. शाळेमध्ये फक्त मुले शिकत असतानाही त्यांनी मुलींचा उत्तम पेहराव करून सुरेख सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी 12 नृत्यसंगीत व 4 समूहगान सादर करण्यात आले.
यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, वर्गशिक्षक, कर्मचारी, शाळेच्या पॅरन्टस् टिचर असोसिएशन (पीटीए) व व्हिन्सेटीयन ओल्ड बॉईज असोसिएशन (व्होबा) संघटनेचे पदाधिकारी असे सुमारे 2 हजार लोक उपस्थित होते.
सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या शतकोत्तर-सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कला प्रदर्शन, कॉफी टेबल पुस्तक प्रकाशन, आंतरशालेय कॅरोल वाचन सादरीकरण स्पर्धा, मॅरथॉन, आंतरशालेय मैदानी स्पर्धा, फुटबॉल आणि बास्केटबॉल स्पर्धा, आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा, वर्गशिक्षिका परिषद अशा भरगच्च कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

