· महोत्सवाच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
· जगप्रसिद्ध अक्षर लेखनकार अच्युत पालव यांच्या कल्पनेतून साकारले बोधचिन्ह
· अनेक युवा कलाकारांच्या कलाविष्काराने अविस्मरणीय ठरणार यंदाचा महोत्सव
पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ या वर्षी बुधवार, दि. ७ ते रविवार, दि. ११ डिसेंबर या पाच दिवसांदरम्यान न्यू इंग्लीश स्कूल, रमणबाग शाळेच्या मैदानावर होणार आहे. या प्रतिष्ठेच्या महोत्सवाचे यंदाचे हे ६४ वे वर्ष असून यामध्ये सहभागी होणा-या कलाकारांची नावे आणि महोत्सवाचे वेळापत्रक आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. याबरोबरच जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी साकारलेल्या महोत्सवाच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले.
यंदाच्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’स युनियन बँक ऑफ इंडिया, पु. ना. गाडगीळ अॅण्ड सन्स, श्री धूतपापेश्वर लिमिटेड आणि नांदेड सिटी यांचे शीर्षक प्रायोजकत्व लाभले असून वास्तुशोध प्रोजेक्टस्, सीड इन्फोटेक लिमिटेड व भारती विद्यापीठ हे या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक असतील. याशिवाय अमित एन्टर प्रायजेस हाउसिंग लिमिटेड यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग, तर बँक ऑफ इंडिया यांनी छायाचित्र प्रदर्शनाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. तसेच ‘सिक्स्थ इलिमेंट’ हे आऊटडोअर पार्टनर तर ‘इंडियन मॅजिक आय’ ही संस्था महोत्सवाचे ब्रॅण्डिंग व कम्युनिकेशन पार्टनर असणार आहेत.
युनियन बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक व्यवस्थापक अमिना कुलकर्णी, वास्तुशोध प्रोजेक्टस् चे संचालक नितीन कुलकर्णी, सीड इन्फोटेक लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका भारती ब-हाटे, बँक ऑफ इंडियाच्या सुजाता देशपांडे आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
यंदाच्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’मध्ये तब्बल २१ कलाकार आपला कलाविष्कार सादर करतील. ज्यामध्ये देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबरच युवा पिढीतील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात असणार असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.
यंदाच्या महोत्सवाच्या पहिले तीन दिवस (डिसेंबर ७,८,९) व शेवटच्या सत्राची (डिसेंबर ११) वेळ ४ ते रात्रौ १० अशी असेल तर शनिवार, दि. १० डिसेंबरचे सत्र परवानगी मिळाल्यास सायंकाळी ४ ते रात्री १२ पर्यंत चालेल.
महोत्सवातील कार्यक्रमांचा तपशील –
‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या पहिल्या दिवसाची (बुधवार, दि. ७ डिसेंबर) सुरवात भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य एस. बल्लेश आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा बल्लेश यांच्या सनई वादनाने होईल. २०१६ हे वर्ष भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे जन्म शताब्दी वर्ष असून, महोत्सवाचा पहिला दिवस त्यांना समर्पित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे त्यांना समस्त गान रसिकांतर्फे आदरांजली वाहण्यात येईल. यानंतर श्रीमती पद्मा तळवलकर, पं. जितेंद्र अभिषेकी यांसारख्या दिग्गजांचे शिष्यत्व लाभलेल्या श्रीमती गौरी पाठारे यांचे गायन होईल. तसेच इमदादखानी घराण्याचे उस्ताद इमरत खान यांचे चिरंजीव आणि शिष्य उस्ताद इर्शाद खान यांचे ‘सूरबहार’ या सतारीशी मिळत्या-जुळत्या वाद्याचे सादरीकरण होईल. पहिल्या दिवसाची सांगता किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक पं. गणपती भट यांच्या सुरेल गायनाने होईल.
दुस-या दिवशी (गुरुवार, दि. ८ डिसेंबर) रोजी रसिकांना बनारस घराण्याचे रितेश व रजनीश मिश्रा यांचे गायन ऐकण्याची संधी मिळेल. रितेश व रजनीश हे ज्येष्ठ गानबंधू पं. राजन – मिश्रा यांचे चिरंजीव आणि शिष्य असून ते या वर्षी प्रथमच आपली कला महोत्सवात पेश करतील. नंतर पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या शिष्या देबोप्रिया आणि सुचिस्मिता या भगिनी आपल्या बासरी वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील. यानंतर जयपूर-अत्रौली घराण्याच्या श्रीमती मंजिरी असनारे – केळकर यांचे गायन होईल. त्यांना पं. मधुसूदन कानेटकर यांच्याकडून तालीम मिळाली आहे. दुसऱ्या दिवसाची सांगता मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड, पद्मविभूषण पं. जसराज यांच्या गायनाने होईल.
महोत्सवाच्या तिस-या दिवशी (शुक्रवार, दि. ९ डिसेंबर) पतियाळा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. अजय चक्रवर्तीं यांचे शिष्य ब्रजेश्वर मुखर्जी यांचे गायन होईल तसेच डॉ. म्हैसूर मंजुनाथ व म्हैसूर नागराज हे बंधू कर्नाटकी अंगाच्या व्हायोलीनची जुगलबंदी सादर करतील. यानंतर हैदराबादच्या भरतनाट्यम पारंगत श्रीमती पूर्वाधनश्री यांचे नृत्य होईल. या दिवसाचा शेवट ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा या तीनही घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारे व गजानन बुवा जोशी यांचे शिष्य पं. उल्हास कशाळकर यांच्या शास्त्रीय गायनाने होईल.
चौथ्या दिवशी (शनिवार, दि. १० डिसेंबर) श्रीमती अश्विनी भिडे – देशपांडे यांची शिष्या धनाश्री घैसास प्रथमच आपली गायन कला रसिकांसमोर सादर करेल. जयपूर घराण्याची ही पारंगत शिष्या सवाई गंधर्व शिष्यवृत्तीची मानकरी आहे. नंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि सुपुत्र श्रीनिवास जोशी यांचे गायन होणार आहे. त्यानंतर दिल्लीस्थित लक्ष्य मोहन गुप्ता आणि आयुष मोहन गुप्ता या बंधूचे सतार आणि सरोदवादन होईल. डागर घराण्याचे सुप्रसिद्ध पं. उदय भवाळकर यांचे धृपद गायनानंतर या सत्राची सांगता कर्नाटक संगीतातील ख्यातनाम व्हायोलीनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम आणि त्यांचे पुत्र अंबी यांच्या सहवादनाने होणार आहे.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी (रविवार, दि, ११ डिसेंबर) जगप्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे जपानी शिष्य ताकाहीरो अराई यांचे संतूर वादन सादर करतील. तसेच किराणा घराण्याचे गायक आणि पं. संगमेश्वर गुरव यांचे शिष्य आणि सुपुत्र कैवल्यकुमार यांचे देखील गायन होणार आहे. यानंतर सुप्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खान आपले शिष्य आणि सुपुत्र अमान अली बंगश आणि अयान अली बंगश यांच्याबरोबर सहवादन करतील. परंपरेप्रमाणे महोत्सवाचा समारोप किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. श्रीमती प्रभा अत्रे यांच्या गायनाने होणार आहे. एकूणच यंदाचा महोत्सव हा संगीत रसिकांसाठी मेजवानी ठरेल यात शंका नाही.
यावर्षीच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात आपली कला प्रथमच सादर करणारे कलाकार पुढील प्रमाणे- एस. बल्लेश व कृष्णा बल्लेश, रितेश व रजनीश मिश्रा, देबोप्रिया व सुचिस्मिता, ब्रजेश्वरमुखर्जी, डॉ.म्हैसूर मंजुनाथ व म्हैसूर नागराज, श्रीमती पुर्वाधनश्री, लक्ष्य व आयुष मोहन गुप्ता, धनाश्री घैसास,ताकाहीरोअराई.
महोत्सवाची तिकीट विक्री –
या संपूर्ण महोत्सवासाठी सीझन तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार असून, खुर्चीसाठी संपूर्ण सत्रासाठी तिकीट दर रु. ३०००/- इतका असेल. चलनी नोटांची बाजारातील कमतरता लक्षात घेत यंदाच्यावर्षी भारतीय बैठकीसाठी गेली तेरा वर्षे असलेली संपूर्ण सत्राच्या तिकिटाची मूळ ३५०/-रुपये ही रक्कम कमी करण्यात आली असून रु. ३००/- इतकी करण्यात आली आहे. याशिवाय भारतीय बैठकीसाठी दरदिवसाची तिकीटे देखील उपलब्ध करून दिली जाणार असून, पाचही दिवसांसाठी प्रति दिवस रु. १००/-असा तिकीट दर असेल.
नोटांच्या अडचणींमुळे रसिकांना तिकिट खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असून तिकीट विक्रीची तारीख आणि त्यासंबंधीची अधिक माहिती देणारे निवेदन पुढील आठवड्यात आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे प्रसारित करण्यात येईल.
चलनी नोटांचा तुटवडा लक्षात घेत युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्या प्रतिनिधीनी रसिकांसाठी चलनाची पूर्ण व्यवस्था योग्य पद्धतीने करण्याचे आश्वासनही यावेळी दिले.