पुणे : वडिलांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून दिलेले प्रोत्साहन, गुरुंनी मुली बासरी शिकत आहेत असा भेदभाव न करता केलेले मार्गदर्शन आणि रसिक श्रोत्यांनी भरभरून दिलेले प्रेम या सगळ्या गोष्टींमुळेच आजपर्यंतचा बासरीवादनाचा प्रवास पार पडला, अशा शब्दांत बासरीवादक बहिणी म्हणून ओळखल्या जाणा-या सुचीस्मिता व देबोप्रीया यांनी आपला आजपर्यंतचा बासरीवादनाचा प्रवास उलगडला.
निमित्त होते ६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या अंतर्गत आयोजित करण्यात येत असलेल्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमाचे. आज झालेल्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमात बासरीवादक बहिणी सुचीस्मिता व देबोप्रीया यांची मुलाखत पार पडली. प्रसिद्ध निवेदक मंगेश वाघमारे यांनी ही मुलाखत घेतली.
आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी हे ही यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना देबोप्रीया म्हणाल्या, “मुली आहोत म्हणून गायन, नृत्य शिका असा भेदभाव आमच्या बाबतीत झाला नाही. उलट वडिलांनी आमच्या बासरीवादनाला प्रोत्साहनच दिले. पं हरीप्रसाद चौरसिया यांनीही आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. यानंतर जेव्हा आम्ही व्यासपीठावरून बासरीवादन सादर करू लागलो तेव्हा काहीतरी वेगळे मात्र चांगले करीत आहोत याची जाणीव आम्हाला रसिक प्रेक्षकांनी करून दिली. त्यानंतर आलेला आत्मविश्वास हा खूप काही देणारा ठरला.’’
काल ‘सवाई’च्या व्यासपीठावर गेल्यावर अक्षरश: घाम फुटला होता. आम्ही बासरीवादन करू शकू का असा प्रश्न क्षणभर मनात आला. मात्र व्यासपीठावर बसल्यानंतर या व्यासपीठाची आणि रसिक श्रोत्यांची सकारात्मक उर्जा प्रकर्षाने जाणविली. हीच उर्जा या व्यासपीठाची खासियत आहे. आणि म्हणूनच पुणे हे संगीत क्षेत्राचे जणू तीर्थक्षेत्र आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असेही मत सुचीस्मिता यांनी व्यक्त केले. या महोत्सवात आमच्या कलेचे सादरीकरण करायला मिळणे ही बाब आमच्यासाठी खूप महत्त्वाची असून, तो या क्षेत्रातील सर्वांचा आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे असे आम्ही मानतो, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

