नागपूर-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे जातीव्यवस्थेवरील वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. शुक्रवारी नागपुरात एका पुस्तकाचे प्रकाशन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी जात आणि वर्णव्यवस्था संपवण्याचे आवाहन केले आहे. भागवत म्हणाले – समाजाचे हित पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वर्ण आणि जातिव्यवस्था ही जुनी विचारसरणी होती, ती आता विसरायला हवी, असे म्हणायला हवे. भागवत त्यांनी ब्राम्हण हा जन्माने नाही तर क्रमाने ठरत असतो. धर्मशास्त्रात देखील हेच सांगितलं आहे. मात्र मधल्या काळात जातीभेदाची चौकट घट्ट झाली आणि मानवाला मान खाली घालायला लावणारे कृत्य घडले . त्यामुळं आपण पापक्षालन करायला हवं असं भागवत म्हणालेत.
विदर्भ संशोधन मंडळाच्यावतीने ‘वज्रसूची-टंक’ या डॉ. मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी वा.वि. मिराशी सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी म्हटलं, “आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली.”
“वर्ण व जातीव्यवस्था आता भूतकाळ झाला आहे. कोणालाही विषमता नको. हीच सर्वाच्या मनातील गोष्ट डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली. ती आपण स्वीकारली आणि त्यानुसार आपण आचरण करण्याचा जोरकसपणे प्रयत्न करित आहोत”, असेही भागवत म्हणाले.
“ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होतो, त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही”, असंही त्यांनी नमूद केलं.
दसऱ्याच्या दिवशी रोजगारावरील वक्तव्यावरूनही झाला वाद
दसऱ्याच्या दिवशी नागपुरात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भागवत म्हणाले होते, ‘भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात आर्थिक आणि विकासाचे धोरण रोजगाराभिमुख असावे ही अपेक्षा साहजिक असेल, पण रोजगार म्हणजे केवळ नोकऱ्या नाहीत, ही समज समाजात वाढवावी लागेल. कोणतेही काम प्रतिष्ठेच्या दृष्टीने लहान किंवा मोठे नसते; श्रम, भांडवल आणि बौद्धिक श्रम या सर्वांना समान महत्त्व आहे. उद्योजकीय प्रवृत्तींना प्रोत्साहन दिले पाहिजे. यामध्ये स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ते पुढे नेण्याची गरज आहे.
संघप्रमुखांच्या या वक्तव्यावर आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद म्हणाले होते की, ‘केवळ संघाच्या ठगांकडून प्रशिक्षण घेतलेले आणि संघाच्या महाखोट्या, महाकपटी शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन मते गोळा करतात? जेव्हा-जेव्हा आरएसएस-भाजप स्वतःच्या वक्तव्यांत अडकतात तेव्हा द्वेष पसरवणारे सज्जन न मागता ज्ञान वाटायला येतात.”

