पुणे, दि.२६: भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘संविधान सन्मान दौड’ मध्ये चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर स्पर्धेला सुरुवात झाली.
यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीजचे प्रमुख व अधिष्ठाता डॉ.विजय खरे, अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अविनाश महातेकर, कर्नल विजय कुमार, कर्नल मुखर्जी आदी उपस्थित होते.
यावेळी संविधनातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या दौडमध्ये पॅराप्लेगिक सेंटरचे वीस जवान तर आर्मीचे साठ जवान सहभागी झाले होते.
संविधान अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे – चंद्रकांत पाटील
भारताच्या संविधानाबाबत प्रत्येकालाच माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय संविधान हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे असे मत मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले. नवीन शिक्षण पद्धतीत सर्व अनुकूल बदलांचा समावेश असेल असेही ते म्हणाले.
कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, संविधानाने आपल्याला दिलेल्या ताकदीचे आकलन करून त्याचा उपयोग आपले जीवन अधिक चांगले करण्यासाठी करावा. संविधानाने आपल्याला जो विचार दिला आहे तो प्रत्येकाने आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे.
अमिताभ गुप्ता म्हणाले, आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी संविधान अभ्यासतो, ही संविधानाची ताकद आहे. या दौडमध्ये सहभागी झालेल्यांनी आपले शारीरिक स्वास्थ सुदृढ ठेवावे.
यावेळी अनुक्रमे १०, ५ व ३ किलोमीटर धावण्याच्या या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली तर सहभागींना प्रमाणपत्र व पदक देण्यात आले. कार्यक्रमाला आर्मी व सदर्न कमांडचे सहकार्य लाभले.