पुणे:- दिव्यचक्षू, वंचितांच्या आयुष्यात असे खूप कमी क्षण येतात ज्यात त्यांना आनंद, प्रेम, आपुलकी मिळते पण आज “रंगारंग दिवाळी पहाट” या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनात आपण ‘ प्रकाश ‘ देण्याचे अनमोल कार्य केले आहे असे गौरवोद्गार काढले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांनी.
निमित्त होते संवाद पुणे आणि आम्ही एकपात्री, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “रंगारंग दिवाळी पहाट” या कार्यक्रमाचे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात ‘ एकलव्य न्यासाच्या ‘ वंचित मुलांना फटाक्यांऐवजी ‘पुस्तक’ भेट , दिवाळी फराळ,भेटवस्तू सुप्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांच्या हस्ते तर अद्वैत परिवाराच्या दिव्यचक्षू रिना पाटील, शेहनाज व इतर मुलामुलींना भेटवस्तू ,फराळ रेणुताई गावस्कर यांच्या हस्ते तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी आणि फराळ उद्योजक सुरेश कोते यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी राजीव तांबे म्हणाले, ” समाजातील या दुर्लक्षित लोकांची दाखल घेऊन त्यांचा सन्मान करणे तसेच त्यांना दिवाळी सणाच्या आनंदात सामावून घेण्याचे कार्य हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे “.
या प्रसंगी रंगारंग दिवाळी पहाट या रसिकांसाठी विनामूल्य असलेल्या कार्यक्रमात वंदन नगरकरांच्या ‘रामनगरीचा’ हास्यफराळ तर चंद्रकांत परांजपे यांच्या विडंबनगीताने, शेखर केदारी यांच्या स्कीटने खुसखुशीतपणा आला तर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य असलेल्या दत्तप्रसाद शहाणे यांच्या शास्त्रीय गायनाने, मधुरा गोडसे यांच्या मखमली आवाजाने, उमा नेने यांच्या किशोर कुमार, शमशाद बेगम यांच्या आवाजातील गीतांनी बहार आणली. राजेश शिंगाडे, अनुपमा खरे यांच्या उडत्या चालीच्या गीतांनी धमाल आणली तर सचिन डान्स अकॅडमीच्या नृत्य कलाकारांनी आपल्या अनोख्या नृत्यकलेने रसिकांची मने जिंकली. या सर्वांना तितकीच मोलाची साथ दिली ती किबोर्डवर श्रीकांत खडके, ड्रम मशीन विजय भोंडे, ढोलकी सुरज कांबळे, तबला अमित अत्रे यांनी. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती कुलकर्णी,डॉ. कविता घिया यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता सर्व कलाकार आणि रसिकांच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संवाद पुणेचे सुनिल महाजन, निकिता मोघे, आम्ही एकपात्रीचे सचिव वंदन नगरकर यांनी केले होते.