‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१६’ नाट्य सोहळ्यातील ५ नाटकं जाहीर
महाराष्ट्राच्या कानाकोप-यात लोकप्रिय झालेल्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी महोत्सवाने यंदा १७ व्या वर्षात यशस्वीरीत्या पदार्पण केले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे हे सोळावे वर्ष असून ही संस्था नाट्य आणि सिनेसृष्टीतील कलाकृतींना सन्मान मिळवून देण्यासाठी अविरतपणे कार्य करत आहे. चित्रपट आणि नाटक अशा दोन प्रमुख गटात हा महोत्सव विभागला गेला असून, यंदाच्या ‘१६ व्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी २०१६’ पुरस्कारांसाठी नाट्य विभागातून सर्वोत्कृष्ट पाच नाटकांची निवड करण्यात आली आहे, यात शेवग्याचा शेंगा (श्री चिंतामणी), डोंट वरी बी हॅप्पी (सोनल प्रोडक्शन), ऑल दि बेस्ट २ (अनामय निर्मित), परफेक्ट मिस मॅच (सोनल प्रोडक्शन), दोन स्पेशल (अथर्व निर्मित) या नाटकांचा समावेश आहे. या स्पर्धेत एकूण २७ नाटकांनी सहभाग घेतला होता. नाट्य परीक्षण विभागातील प्रदीप कबरे, रोहिणी निनावे आणि अविनाश खर्शीकर यांनी यंदाच्या नाट्यस्पर्धेच्या परिक्षणाची धुरा सांभाळली आहे.
यंदाचा नाट्य महोत्सव १९ ते २२ मार्च रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात रंगणार आहे. या नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना कमी दरांत नाटक पाहता येणार आहे. त्याचबरोबर चित्रपट महोत्सव ६ आणि ७ एप्रिल २०१६ रोजी रवींद्र नाट्य मंदिरात साजरा होणार असून त्याची सर्वोत्कृष्ट १० चित्रपट लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती संस्कृती कलादर्पण संस्थेचे आयोजक चंद्रशेखर सांडवे व अर्चना नेवरेकर यांनी दिली.