मुंबई-पत्राचाळ प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी पुन्हा 5 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊतांचा मुक्काम सध्या ऑर्थर रोडच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. गेल्या 22 दिवसांपासून ते तुरुंगात आहेत.
गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात ईडीने 30 जुलै रोजी संजय राउत यांना अटक केली होती. यानंतर 8 ऑगस्ट रोजी न्यायालयाने संजय राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणी ईडीची चौकशी सुरू असल्याने ईडीकडून संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली.यावर कोर्टाने त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडचे संचालक प्रवीण राऊत यांच्या आडून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्राचाळ घोटाळा केल्याचे सक्तवसुली संचालनालयाने विशेष पीएमएलए कोर्टात सोमवारी सांगितले. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडचे संचालक प्रवीण राऊत यांनी एक पैसाही या प्रकल्पात गुंतवला नाही. मात्र, त्यांच्या खात्यात 112 कोटी रुपये आले. याचा फायदा राऊत यांनाही झाला.
संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यात 1 कोटी 60 लाख रुपयांचे हस्तांतर झाले. याच पैशांतून राऊत यांनी अलिबागच्या किहीम बीचवर एक प्लॉट घेतला, तर स्वप्ना पाटकर यांच्या नावावर एक प्लॉट घेण्यात आला. प्रवीण राऊत यांच्या आडून संजय राऊत यांनी घोटाळा केल्याचे निदर्शनास येत आहे. स्वप्ना पाटकर आणि प्लॉट मालक यांनीही पैसे मिळाल्याचे सांगितले आहे. प्रवीण राऊत हा संजय राऊत यांचा जवळचा व्यक्ती आहे. त्यानेच म्हाडा आणि इतर योजनांमध्ये राऊत यांना फायदा मिळवून दिल्याचे ईडीने कोर्टाला सांगितले आहे.

