पुणे-आपल्या भागातील नागरिकांची गरज लक्षात घेउन त्यानुसार विकास निधी चा विनियोग करणे व लोकोपयोगी आणि आवश्यक गोष्टीसाठीच निधी खर्च करण्याचा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचा निर्धार अभिनंदनीय व अनुकरणीय असल्याचे सजग नागरिक मंच चे प्रमुख विवेक वेलणकर म्हणाले.आपल्या प्रभागात झावळ्याचा आणि पाला पाचोळयाचा कचरा मोठ्या प्रमाणात असून आता नवीन टिपर व ढकलगाडयान्मुळे हा कचरा नियमित उचलण्याची सोय उपलब्ध झाली असल्याने हा हिरवागार प्रभाग अधिक स्वच्छ राखण्यास मदत होइल असे ही ते म्हणाले.नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या विकास निधीतून विकत घेतलेल्या टिपर व ढकलगाड्यांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.यावेळी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,नगरसेवक जयंत भावे,ब्राउन लीफ संस्थेच्या अदिती देवधर,एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रमोद शेजवलकर,श्रीकांत पुराणिक,पदाधिकारी अजीत गोखले,प्रभाकर देशपांडे,संकुल सोसायटी चे अध्यक्ष व रेन वॉटर हार्वेस्टिंग मधील तज्ञ दयानंद पानसे,मोहल्ला कमिटी च्या रुपालीताई मगर,भाजप चे पदाधिकारी कुलदीप सावळेकर,राजेंद्र येडे,राज तांबोळी,सुनिल होलबोले,संगीताताई आदवडे,सुवर्णाताई काकडे,सुलभा जगताप,भारतीताई अकोलकर,हेमंत भावे,नारायण वायदंडे,सुयश गोडबोले,वरिष्ठ आरोग्य निरीक्षक दीपक ढेलवान,आरोग्य निरीक्षक फकीर शेख,किरण गुरव,राहुल शेळके व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
प्रभाग १३ एरंडवणे हॅपी कॉलनी हा ग्रीन पुणे चे प्रतीक असलेला प्रभाग असून येथे मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने साहजिकच पाला पाचोळा व झावळयांचा कचरा मोठ्या प्रमाणावर साठतो,ह्या कचऱ्याची समस्या लक्षात घेउन मी फक्त हा कचरा संकलित करण्यासाठी विकासनिधीत टिपर ची तरतूद केली व सातत्याने पाठपुरावा करुन आता हे वाहन उपलब्ध होत आहे असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.या गाडीचे भागश:नियोजन केले असून त्याचे वेळापत्रक सर्व प्रभागात कळविण्यात येइल व त्यानुसार पाला पाचोळा व झावळ्याचा कचरा संकलित केला जाइल असे ही त्या म्हणाल्या.तसेच हा कचरा फुरसुंगी किंवा उरळी ला न टाकता ब्राउन लीफ संस्थेच्या मदतीने प्रभागातच त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाइल जेणेकरून वाहनांना लांबपर्यंत कचरा टाकायला जाण्याचा खर्च,वेळ,मनुष्यबळ या सगळयाची बचत होइल व प्रदूषण ही रोखले जाइल असे ही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
आम्हाला निवडून आल्यानंतर कधीतरीच दिसणारे आणि पाच वर्षात आर्थिकदृष्ट्या गब्बर झालेले लोकप्रतिनिधी बघण्याची सवय असताना मंजुश्री खर्डेकर सातत्याने प्रभागात नवनवीन उपक्रम राबवत आहेत हे कौतुकास्पद असून बहुधा हाच भाजप आणि इतरान्मधील फरक आहे असे ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री प्रमोद शेजवलकर म्हणाले.
आपल्या अवती भवती जाळला जाणारा पाला पाचोळा बघून मी खुप अस्वस्थ व्हायचे आणि मग मी निर्धार केला की जर हा कचरा निर्माण करणारे आणि त्याची शास्त्रीय पद्ध्तीने आपल्याच बागेत विल्हेवाट लावु शकणारे असे दोन्ही घटक जर एकाच भागात आहेत तर त्यांच्यात समन्वयक म्हणून काम करायचे आणि मग मी आत्तापर्यंत ५००० पोती पाला पाचोळा जिरवला असे ब्राउन लीफ संस्थेच्या अदिती देवधर यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात आला तर विवेक वेलणकर यांनी टिपर च्या चालकाचा विशेष सत्कार करुन त्याच्यावर मोठी जबाबदारी असल्याचे नमूद केले.
नगरसेविका आणि या कार्यक्रमाच्या संयोजिका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक,संदीप खर्डेकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन तर नगरसेवक जयंत भावे यांनी आभार प्रदर्शन केले.