पुणे-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास डी.पी. रस्त्यावरून प्रवेश मिळावा तसेच विकास योजनेतील प्रस्तावित रस्ता कायम करावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक 13 च्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा विस्तार प्रचंड वाढला असून या रुग्णालयात रोज हजारो वाहन आणि नागरिक ये जा करीत असतात. या रुग्णालयास एकच प्रवेशद्वार असून तेथील रस्ता अरुंद आहे. शेजारीच सेवासदन शाळा असून तेथे येणारे विद्यार्थी/पालक, तसेच तेथील मोठे गृहप्रकल्प संकुल /हिमाली व अन्य सोसायटीच्या रहिवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमधे रुग्णवाहिका देखील अडकून पडतात तसेच छोटे मोठे अपघातही घडत असतात, असे नगरसेविका मंजुश्री यांनी पत्रात नमुद केले आहे.
तसेच या सगळ्यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणजे रुग्णालयास मागील बाजुने प्रवेश उपलब्ध करून देणे. प्रस्तावित डी. पी. मध्ये ई पी आर (Excluded portion roads) सदर रस्ता हा डी पी रस्त्यावरून (म्हात्रे पूल ते राजाराम पूल या रस्त्यावरून मल्टी स्पाईस हॉटेल शेजारून) आखलेला आहे. तरी सदर रस्ता ई पी आर मध्ये कायम करावा व तदनंतर तेथील भूसंपादन त्वरित पूर्ण करून रस्ता प्रत्यक्षात यावा, अशी मागणी मंजुश्री यांनी पत्रातून केली आहे.