छोट्या सहकारी बॅंकाना मुद्रा कर्ज प्रकरणे करण्यास परवानगी देण्याबाबत केंद्राकडे विनंती करु – सुभाष देशमुख
पुणे–छोट्या सहकारी बॅंकाना ही मुद्रा कर्ज वाटपाची परवानगी द्यावी व त्यांना या योजनेत सहभागी करुन घ्यावे यासाठी आपण केंद्र सरकारला विनंती करु असे आश्वासन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले .उद्यम विकास सहकारी बॅंकेच्या आठव्या शाखेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.गुरुवार पेठेतील शितळादेवी चौकात या शाखेचे उद्घााटन करण्यात आले.ठेवीदारांचा सत्कार करण्यापेक्षा कर्जदारांचा सत्कार करावा कारण प्रामाणिक कर्जदाराकडून नियमित हप्ते भरले गेले व त्याने कर्ज दिलेल्या कालावधीत फेडले तर ठेवीदारांचा पैसा सुरक्षित राहतो असे ही ते म्हणाले.तसेच बॅंकेच्या संचालकांनी ही कर्ज वाटप करताना दक्षता घ्यावी असे सांगतानाच ” या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या नगरसेवक व राजकीय नेत्यांनी जवळच्या माणसांच्या कर्ज प्रकरणासाठी आग्रह धरु नये असे आवाहन ही त्यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश बापट म्हणाले ” सहकार चळवळ टिकली पाहिजे अशी आमची इच्छा असुन संचालकमंडळाने विश्वस्त म्हणून काम केले व नियमबाह्य कर्जप्रकरण न करता लोकांचा विश्वास जिंकला तर सहकारी बॅंकांच्या प्रती नागरिकांचा ओघ परत वाढेल.सध्या काही सहकारी बॅंका बुडित निघाल्यामुळे अडचणी येत आहेत पण अश्या परिस्थितीत उद्यम बॅंकेने शंभर कोटीचा टप्पा पार केला व आज आठव्या शाखेचे उदघाटन होते आहे हे कौतुकास्पद असल्याचे ही ते म्हणाले. या बॅंकेचे संचालक हे पतित पावन संघटनेच्या माध्यमातून समाजकार्यात होते म्हणून ते चांगले काम करु शकले असेही त्यांनी सांगितले.
नोटाबंदीच्या काळात सहकारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी १२/१४ तास काम करुन जनसेवा केली असे बॅंकेच्या संचालिका माधुरीताई मिसाळ यांनी नमूद केले व सहकारी बॅंकांना येणाऱ्या अडचणीबाबत सहकार मंत्र्यांनी योग्य निर्देश द्यावेत असेही त्या म्हणाल्या.बॅंकेचे अध्यक्ष पांडुरंग तथा पी के कुलकर्णी यांच्या प्रास्ताविक करताना बॅंकेच्या प्रगतीचा आलेख मांडला व बॅंक सातत्याने “अ ” दर्जा मिळवीत असून हे यश सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे असल्याचे ही ते म्हणाले.
कार्यक्रमास महापौर मुक्ता टिळक ,नगरसेविका व बॅंकेच्या माजी उपाध्यक्ष मंजुश्री खर्डेकर,नगरसेविका आरती कोंढरे ,नगरसेवक सम्राट थोरात ,अजय खेडेकर ,बॅंकेचे संचालक व शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत इ मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संचालक संदीप खर्डेकर यांनी केले तर बॅंकेच्या उपाध्यक्षा लीनाताई अनास्कर यांनी आभार प्रदर्शन केले.
आलेल्या मान्यवरांचा सत्कार संचालक सीताराम खाडे ,मनोज नायर ,शिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.