महिलांनी स्वतःच्या आहाराकडे लक्ष द्यावे – सौ मंजुश्री खर्डेकर. वुमेन फॉर रोटरी तर्फे कष्टकरी महिलांना जेवणाचे डबे वाटप कार्यक्रम संपन्न…
पुणे-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वुमेन फॉर रोटरी या रोटरी क्लब च्या महिला विभागातर्फे कष्टकरी महिलांना जेवणाचे डबे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाची भूमिका सांगताना रोटेरियन सौ गौरी शिकारपूर यांनी कष्टकरी महिला / भाजी विक्री करणाऱ्या व घरकाम करणाऱ्या महिला या दुर्लक्षित घटक असल्याने त्यांच्या साठी काहीतरी करावे या भावनेने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे स्पष्ट केले.यावेळी राजश्री शाहू वसाहत ,संजय गांधी वसाहत आणि गणेशनगर वसाहत येथे महिलांना नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते डबे वाटप करण्यात आले.यावेळी सौ खर्डेकर म्हणाल्या ” घरकाम करणाऱ्या व भाजी विक्री अथवा तत्सम व्यवसाय करणाऱ्या महिला सकाळी लवकर उठून मुलांना अथवा कुटूंबातील अन्य सदस्यांना स्वयंपाक करुन डबे देउन कामावर पाठवतात मात्र स्वतःच्या जेवणाची आबाळ करतात,आता असे न करता महिलांनी या डब्यातून स्वतःसाठी देखील पोळी भाजी न्यावी व आपल्या आहाराची काळजी घ्यावी असेही त्या म्हणाल्या” यावेळी रोटरीच्या पद्मजा देशमुख आणि गौरी शिकारपूर यांच्या हस्ते पुणेरी पगडी घालून सौ खर्डेकर यांचा सत्कार करण्यात आला.वस्तीच्या वतीने राज तांबोळी,राजेंद्र येडे व अनुराधाताई एडके यांनी महिला दिन साजरा करताना रोटरीच्या सर्व महिलांना फेटे बांधून स्त्रीत्वाचा आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केले.
कार्यक्रमास रोटरीच्या अवलोकिता माने,अपर्णा रानडे,मीना साने,पद्मजा जोशी,सुचेता भुरे,हर्षदा कुलकर्णी उपस्थित होत्या ,यासह बागेश्री ठिपसे ,संगीताताई शेवडे ,सुवर्णाताई काकडे,नीलेश गरुडकर ,कीर्तीताई गावडे,रामदास गावडे ई मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन गौरी शिकारपूर यांनी केले,राज तांबोळी यांनी स्वागत ,अनुराधाताई एडके यांनी आभार प्रदर्शन केले.