नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील फलकाची दुरावस्था -खर्डेकरांची तक्रार
पुणे- नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील फलकाची दुरावस्था झाल्याची तक्रार क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे .
या संदर्भात त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे.नेताजींप्रती देशवासीयांच्या मनात प्रचंड आदराची भावना आहे. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील अभूतपूर्व कार्य कर्तृत्वाशी सर्व देशवासी किंबहुना सारे जग परिचित आहे.भावी पिढीस त्यांचे स्मरण सदैव राहावे व त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी रस्त्यांना अथवा एखाद्या महत्वाच्या वास्तूस अश्या महनीय व्यक्तींचे नाव दिले जाते.त्या धोरणास अनुसरूनच शिवाजीनगर येथे संचेती हॉस्पिटल व कलानिकेतन साडी सेंटर समोरील चौकास नेताजी सुभाषचंद्र बोस चौक असे नाव देण्यात आले आहे.मात्र या ठिकाणी हा फलक एका कोपर्यात अडगळीत लावल्यासारखा उभारण्यात आला असून त्याची दुरावस्था झाली आहे.तसेच हा फलक दर्शनीय भागात व ठळकपणे दिसेल अश्या पद्धतीने लावलेला नसल्यामुळे या चौकास नागरिक संचेती हॉस्पिटल चौक व तत्सम अन्य नावाने ओळखतात.असे होणे हे एवढ्या महान व्यक्तीवर अन्याय केल्यासारखे व त्यांची अवमानाना केल्यासारखे आहे असे वाटते.तरी या चौकात चारी बाजूस त्यांच्या नावाचे भव्य फलक उभारावेत,तसेच भावी काळात महनीय व्यक्तींची नावे एखाद्या रस्त्याला किंवा चौकाला देताना त्या नामफलकाची वेळोवेळी साफसफाई केली जाईल व त्याचा मान राखला जाईल अशी जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाला दिले जावे अशी आग्रही मागणी करत आहे.