Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुजोर आणि मस्तवाल प्रकाश मेहता ला घरी पाठवा अन्यथा अनर्थ अटळ आहे … ‘साम टीव्ही’च्या संपादकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र(जसेच्या तसे वाचा)

Date:

जनतेच्या डोळ्यात शंकराचा राग आहे!

प्रिय देवेंद्र फडणवीस,

ज्या ज्या वेळी तुम्हाला भेटलो, तेव्हा तेव्हा आश्वासक वाटत आले आहे. मुख्य म्हणजे, तुमच्याशी संवाद होऊ शकतो, ही खात्री असते. ‘या राज्याचे भले व्हावे, यासाठी आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत’, अशी कृतिशील ग्वाही आमचे, सकाळ माध्यम समूहाचे, व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी आपल्याला दिली आहे. त्याप्रमाणे, आम्ही सर्वजण सकारात्मक कामात तुमच्यासोबत होतो आणि आहोत. पण, त्याच चारित्र्याने आम्हाला नैतिक बळ दिले आहे, जे हेही लिहायला आज भाग पाडते आहे.

आज आम्ही अस्वस्थ आहोत. संतापाचा बांध फुटला आहे.
सावित्रीचा पूल वाहून गेला आणि सरकार नावाच्या यंत्रणेवरील विश्वाससुद्धा त्यासोबत वाहून गेला. आपण मध्ययुगात आहोत की काय, असे भय पुन्हा ठळक झाले. जी माणसे मृत्युमुखी पडली, त्यापैकी अनेकांचे मृतदेहही सापडलेले नाहीत. मृतांचा आकडा किती असेल, यांचा अंदाजही करता येणार नाही. हे बळी सावित्रीच्या रुद्रावताराने घेतले नाहीत अथवा पावसाने-पुलानेही घेतले नाहीत. ते बळी या व्यवस्थेने घेतले आहेत.

‘मदारी’ नावाचा सिनेमा नुकताच आला. इरफान खान त्या सिनेमात नायक आहे. एक असा बाप, ज्याचा मुलगा पूल कोसळून मरण पावला. त्याचा मृतदेहही हाती नाही आला. हा सिस्टिमनं केलेला खून आहे, म्हणून वेडापिसा झालेला इरफान, या सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं एल्गार सुरु करतो. हा सिनेमा बघताना डोळ्यांच्या कडा ओलावतात आणि त्याचवेळी कमालीचा संताप येतो.

पण, वास्तव सिनेमापेक्षा अधिक भयावह आहे. आणि, ज्यांना जाब विचारायचा, ते मवाल्यासारखे बेजबाबदारपणे बोलत आहेत. वागत आहेत. प्रकाश मेहता नावाचा मस्तवाल आणि मुजोर बिल्डर या सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री आहे. मुंबईला गहाण ठेवण्यासारखे निर्णय घेणारा हा भ्रष्ट मंत्री. तोच रायगडचा पालकमंत्री आहे. असा पालकमंत्री की जो महाराष्ट्र दिनी झेंडावंदनाला सुद्धा फिरकला नाही. जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकांना पालकमंत्री नसतात. त्यामुळे या बैठका होत नाहीत. सावित्रीचा पूल वाहून गेल्यानंतरही मेहतांना जाग आली नाही. लोक बेपत्ता झाले, होत्याचं नव्हतं झालं. तरी हा पालकमंत्री गुटखा गिळून गप्प. आदरणीय रामभाऊ म्हाळगी म्हणाले, कार्यकर्त्याच्या तोंडात खडीसाखर असायला हवी. यांच्या तोंडात गुटखा. (आणि, तो त्यांना मिळू शकतो, अशी व्यवस्था!)

‘साम मराठी’चे प्रतिनिधी मिलिंद तांबे तिथं, ‘सावित्री’काठी वृत्तांकन करत होते. ज्यांचा कणा मोडून पडलाय, अशा नातेवाईकांचा, त्यांच्या कच्च्या-बच्च्यांचा आक्रोश त्यांनी मंत्र्यांना सांगितला. तर, मंत्री मिलिंदच्याच अंगावर आले आणि अद्वातद्वा बोलू लागले. त्यांच्या या पवित्र्यामुळे त्यांचे चमचेही हातघाईवर आले.(ते मंत्र्यांचे कार्यकर्ते नव्हते, एका बिल्डरचे चमचे होते!) आमदार प्रशांत ठाकूर मध्ये आले नसते तर कदाचित फार भयावह असे काही घडले असते.

देवेंद्रजी, हा माज येतो कुठून? त्यांना विचारा, तुम्ही पालकमंत्री आहात की मालकमंत्री? एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रधानसेवक असल्याचे सांगतात आणि दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे मंत्री अशी निर्लज्ज मुजोरी करतात. हा प्रश्न एका पत्रकारापुरता मर्यादित नाही. आपण लोकांना जबाबदार आहोत, असेच ज्यांना वाटत नाही, त्या नेत्यांचा माज उतरवण्याचा हा मुद्दा आहे. कॅमेरा असलेल्या पत्रकारापुढे हे एवढा माज करतात. तर, सामान्य माणसाचे काय होत असेल? मेहता स्वतः बिल्डर आहेत. गृहनिर्माणमंत्री आहेत. त्यांनी पावसापूर्वी रायगडातल्या पुलांचा, रस्त्यांचा आढावा घ्यायला नको? मेहतांचे एवढे लाड कशासाठी? ते पक्ष पोसतात की आणखी काही करतात? रायगडातल्या जमिनी यांना खुणावतात, पण इथं माणसंही राहतात, त्यांचं काय?

देवेंद्रजी, बाकी कोणत्या मंत्र्याला क्लिन चीट द्यायचे ते बघू नंतर, पण अशा गुटखामंत्र्याला क्लिन चिट दिले, तर त्यातून तुमच्यावरच डाग पडणार आहे. आणि, महाराष्ट्रभर चुकीचा मेसेज जाणार आहे. या एका मुद्द्यावरुन लोकांचा सरकारवरचा उरला सुरला विश्वास संपून जाईल. मेहतांच्या मस्तवालपणाचा हा एकमेव नमुना नाही. सावित्रीकाठी सुरु असलेल्या आक्रोशात सेल्फी काढू इच्छिणारा असा हा निलाजरा मंत्री आहे. तो पायउतार झाला नाही तर अवघ्या सरकारवर खुर्च्या खाली करण्याची वेळ येणार आहे.

मला आशादायक वाटते ते असे की, मिलिंदशी ज्या प्रकारे मंत्री वागले, त्याची दखल सर्व वाहिन्या आणि वृत्तपत्रांनी घेतली. अपवाद वगळता सर्वांनी वाहिनी आणि प्रतिनिधीचे नावही वापरले. मंत्री किती असंस्कृत आहेत, असे म्हणण्याचा अधिकार या माध्यमसमूहांना आणि संपादकांना निश्चितपणे आहे. कारण, त्यांनी ती सुसंस्कृतता आणि प्रगल्भता दाखवली आहे.

अशा मुद्द्यावर कोणीही तेच बोलेल, जे आम्ही बोलतो आहोत. आम्ही तर फक्त ‘माध्यम’ आहोत. पण, लोकांच्या पोटात जी आग आहे, तिचा अंदाज आपल्याला कदाचित नसेल. जनतेने आपला तिसरा डोळा उघडण्यापूर्वी मेहतांना घरी पाठवा. नाहीतर, अनर्थ अटळ आहे.

विंदा करंदीकरांची ही कविता तुमच्यासाठी पाठवतोय. तो आशय समजण्याएवढे आपण समंजस आहात.

जनतेच्या पोटामध्ये
आग आहे, आग आहे;
जनतेच्या डोळ्यांमध्ये
शंकराचा राग आहे …
जनतेच्या हृदयामध्ये
अन्यायाची कळ आहे;
जनतेच्या बाहूंमध्ये
सागराचे बळ आहे …
जनतेच्या इच्छेमध्ये
नियतीचा नेट आहे;
जनतेच्या हातांमध्ये
भविष्याची भेट आहे …
जनतेच्या नसांमध्ये
लाल लाल रक्त आहे;
जनतेच्या सत्तेखाली
पृथ्वीचे तख्त आहे …
जनतेच्या मुक्तीसाठी
अजून एक समर आहे;
आणि जिचा आत्मा एक
ती जनता अमर आहे …
असो.
लाभ नको, लोभ नको.
पण, या क्षोभाकडे दुर्लक्ष नको

आपला,
संजय आवटे.
संपादक, साम मराठी
सकाळ माध्यम समूह

 

(http://www.saamtv.com/blog/saam-editors-letter-to-cm-fadanvis/ येथून हे पत्र कॉपी केलेले आहे )

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...