मुंबई : भारताच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र राज्याची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. स्थानिक आणि परदेशी गुंतवणूकदारांनी राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे केले.
‘समय भारती-2016’च्या वतीने विविध देशातील घड्याळ उत्पादनांचे प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री.देसाई बोलत होते. यावेळी मुख्य आयोजक हेमल खारोद, मिहीर खारोद यांच्यासह उद्योग क्षेत्राशी संबंधित विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी श्री देसाई म्हणाले, राज्यात उद्योगाला पोषक वातावरण असून कुशल मनुष्यबळही उपलब्ध आहे. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर मोठ्या उद्योगांबरोबरच लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. राज्यात विदेशी गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यामुळे उद्योग वाढीबरोबरच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील. राज्याच्या औद्योगिक विकासामध्ये मोठ्या उद्योगांबरोबरच लघु व मध्यम उद्योगांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रदर्शनात भारत, स्वित्झर्लंड, हाँगकाँग, जपान, फ्रान्स, चीन, यूएसए, कोरिया, बेल्जियम, डेन्मार्क, इटली, स्पेन इत्यादी देशातील विविध प्रकारचे १०० ब्रँड यात समाविष्ट आहेत. शिवाय २० नवीन ब्रँडही पहिल्यांदाच मांडण्यात आले आहेत. प्रदर्शनात ५० हजार प्रकारची घड्याळे पाहायला मिळणार आहेत, असे मुख्य आयोजक हेमल खारोद यांनी सांगितले.

