लोकमंथन २०२२ पूर्वरंग’ चे आयोजन : ‘लोक में शक्ती आराधन’ नृत्य सादरीकरण
पुणे : भारताचा आत्मा मुळातच असा आहे की तो केवळ जागृत करण्याची गरज असते, ते काम संतांनी केले. समाजाला एकत्र बांधण्यासाठी महाराष्ट्रातून संत बाहेर पडले आणि देशातील विविध राज्यांमध्ये फिरले. समाजाचे संघटन करणे समाजात आपण एक आहोत, अशी जाणीव निर्माण करणे यासाठी वारीची निर्मिती झाली. असे मत ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.
संस्कार भारती पश्चिम प्रांत आणि प्रबोधन मंच यांच्यावतीने ‘लोकमंथन २०२२ पूर्वरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड येथील बालशिक्षण सभागृहात करण्यात आले होते. यावेळी संस्कार भारतीचे अखिल भारतीय उपाध्यक्ष डॉ. नितीश भारद्वाज, कार्याध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, संस्कार भारतीचे पश्चिम प्रांत महामंत्री सतीश कुलकर्णी, प्रबोधन मंचाचे संयोजक हरिभाऊ मिरासदार, सहसंयोजक किशोर शशितल यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. मुकुंद दातार यांचे पंढरपूरची वारी -संत साहित्यातील राष्ट्रीय भावना या विषयावर व्याख्यान झाले. तसेच संस्कार भारतीच्या माध्यमातून ‘लोक में शक्ती आराधन’ या विषयावरील नृत्यविष्कार सादर झाला.
डॉ.गो.बं. देगलूरकर म्हणाले, वारी करताना ती सजगपणे केली पाहिजे. समाजाला जागृत आणि एकत्रित ठेवण्यासाठी वारी आली. कोणत्याही संतांनी कर्म सोडून वारी करा असे म्हटले नाही, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. मुकुंद दातार म्हणाले, महाराष्ट्राचे साक्षात दर्शन म्हणजे वारी. मराठी लोक जीवनाचे, समूह जीवनाचे ते प्राण तत्व आहे. १५०० वर्षे ही परंपरा अखंडितपणे चालू असून जगाच्या इतिहासातील वारी हा एक चमत्कार आहे. कोणतीही लोक चळवळ इतकी वर्ष चालू राहिलेली आपल्याला दिसत नाही.
ते पुढे म्हणाले, राष्ट्र जगण्यासाठी संस्कृती टिकवावी लागते आणि संस्कृती टिकवण्यासाठी जनमानसात परमार्थ रुजवावा लागतो. वारकरी संप्रदाय ही जीवन निष्ठा आहे, असेही त्यांनी सांगितले.
सतीश कुलकर्णी म्हणाले, ‘लोकमंथन २०२२’ हा केंद्र शासनाच्या माध्यमातून दर तीन वर्षांनी घेतला जाणारा कार्यक्रम ईशान्य भारतात गुवाहाटी मध्ये श्रीमद्शंकरदेव कलाक्षेत्र येथे आयोजित केला गेला आहे. या राष्ट्रीय महत्त्वाच्या परिषदेत प्रबोधन मंचाच्या वतीने पंढरपूर च्या वारी विषयावर डॉ मुकुंद दातार यांचे व्याख्यान व संस्कार भारतीचे वतीने 15 न्रुत्यांगनांची न्रुत्य प्रस्तुती देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या धर्तीवर ‘लोकमंथन पूर्व रंग २०२२’ चे आयोजन पुण्यात करण्यात आले होते.
प्रास्ताविक विनायक गोगटे यांनी केले. त्यात त्यांनी लोकमंथन कार्यक्रमाचा उद्देश व या अगोदर झाले ल्या कार्यक्रमाचे व्रुत्त दिले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सतीश कुलकर्णी यांनी आभार मानले.