तुका म्हणे ऐसे अर्त ज्याचे मनी | त्याची चक्रपाणी वाट पाहे || या अभंगाच्या रचनेप्रमाणे खांद्यावर भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन व पाण्याचे कलश, मुखी हरिनामासह ‘‘तुकाराम तुकाराम’’ जयघोष करीत हा सोहळा पंढरीच्या वाटेला लागला.
या प्रसंगी सारा आसमंत टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीची वीणा माऊली तुकोबा निघाले पंढरपुरा, हे बोल गातच सारा देऊळवाडा व परिसर दणाणून गेला होता. घामाच्या धारांचा अभिषेक घालत उन्हाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या पांडुरंगाला भेटण्यासाठी व मनोहारी रुप पाहण्यासाठी उपस्थित जनसागर पंढरपूरच्या वाटेवरील पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्याकडे रवाना झाला.
आज पालखीचे प्रस्थान असल्याने येतील मुख्य मंदिर, वैकुंठगमन मंदिर परिसरातील इंद्रायणी नदी काठ सकाळपासून फुललेला असतानाच हा पालखी सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करीत जीवनाचे सार्थक झाले यात धन्यता मानत होता.
प्रथेनुसार प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे साडेचारला शिळा मंदिरात सुनील मोरे व विठ्ठल मोरे यांच्या हस्ते सुरुवात झाली. पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे व अभिजित मोरे यांच्या हस्ते, सहा वाजता जालिंदर मोरे, अशोक मोरे यांच्या हस्ते वैकुंठगमन मंदिरात विश्वस्त मंडळाच्या यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. सात वाजता तपोनिधी पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधीची महापूजा सकाळी दहा वाजता पहाती गवळणी तवती पालथी दुधानी | म्हणती नंदाचीया पोरे आजी चोरी केली खरे या अभंगाचे निरूपण करीत पालखी सोहळ्याच्या काल्याचे कीर्तन संभाजी महाराज मोरे देहूकर यांनी केले. या कीर्तनाने या अखंड हरिनाम सोहळ्याची सांगता झाली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास म्हसलेकर मंडळी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका घोडेकर सराफांच्या भालचंद्र घोडेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी चकाकी दिलेल्या पादुका आणण्यासाठी म्हातारबुवा दिंडी व मानकरी गंगा म्हसलेकर हे घोडेकर यांच्या वाड्यात दाखल झाले, येथे अभंग आरती झाल्यानंतर म्हसलेकरांनी या पादुका डोक्यावर घेऊन इनामदार वाड्यात आणल्या येथे पादुकांची विधीवत पूजा दिलीप महाराज मोरे गोसावी यांच्या हस्ते करण्यात आली. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर इनामदार वाड्यातील पूजा उरकल्यानंतर पादुका पालखीचे मानकरी गंगा म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात देण्यात आल्या. म्हतारबा दिंडीसह ह्या पादुका डोक्यावर घेऊन टाळ मृदंगाच्या तालावर भक्तीमय वातावरणात वाजत गाजत मुख्य मंदिरात आणल्या येथे मंदिराला प्रदक्षिणा घालून भजनी मंडपात आणल्या.
यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, प्रा. विश्वनाथ कराड, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसिलदार गीतांजली शिर्के, पंचायत समिती सदस्य हेमलता काळोखे, सरपंच सुनीता टिळेकर, सभापती गुलाब म्हाळसकर, प्रशांत ढोरे, बाळासाहेब काशिद, विजय लांडे, सुहास गोलांडे, कांतीलाल काळोखे, हेमा मोरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध अधिकारी व दिंड्याचे विणेकरी आदी मान्यवर उपस्थित होते. पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे, सुनील दिगंबर मोरे व जालिंदर महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे, विश्वस्थ अशोक निवत्ती मोरे, विठ्ठल मोरे, सुनील दामोदर मोरे, दिलीप महाराज मोरे गोसावी आदी उपस्थित होते.
पूजेनंतर चोपदार नामदेव निवृत्ती गिराम यांनी आरती म्हणत कार्यक्रमाला प्रस्थान कार्यक्रमास सुरूवात झाली. मानकऱ्यांचा व दिंडीकऱ्यांचा नारळ प्रसादाने सन्मान केला. चोपदार नामदेव गिराम कानसुलकर, नारायण खैरे, देशमुख चोपदार व सेवेकरी तानाजी कळमकर, कांबळे यांच्यासह सर्व मानकऱ्यांना व सेवेकरी मंडळींना संस्थानच्या वतीन नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.
प्रथेप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या पादुका उपस्थितांच्या हस्ते फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. महाराजांच्या पादुका पालखीत ठेवल्यानंतर सेवेकरी व मानकऱ्यांनी आपली सेवा बजावली. मानाचे पालखीचे भोई तानाजी कळंबकर, कांबळे यांच्यासह भाविकांनी खांदा दिला. याच वेळी तुतारीधारक पोपट तांबे यांनी तुतारी फुंकली. यावेळी भाविकांनी उपस्थित वारकऱ्यांनी एकच जल्लोष करीत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम नामाचा जयघोष करण्यास सुरूवात केली. या जयघोषाने आसमंती गजर करीत पताका उंचावून शंख नादात चौघडा व ताशांच्या गजर केला.
भजनी मंडपातून पालखी बाहेर येताच दिंड्यांत सहभागी असलेल्या वारकऱ्यांमध्ये उत्साह भरला, त्यांच्या मुखातुन आपोआपल अभंगाचे बोल बाहेर पडत होते. हातातील टाळ विणा मृदंगाच्या तालावर पावले थिरकत होती, ही पावले कोट प्रकारात आपले खेळ करीत भक्तीरसात न्हाऊन निघाली होतीे. सर्व वारकरी वातावरणात दंग झाले होते. वारकऱ्यांमध्ये फुगड्यांचा खेळ रंगू लागला होता, सारी देहूनगरी भक्तीमय झाली होती. याच वेळी चौघड्याचे मानकरी पांडे, यांनी चौघडा व रियाझ मुलाणी यांनी ताशा वाजविण्यास सुरवात करताच उत्साही वातावरणात पालखीवर दत्ता याने छत्री धरली, माणिक अवघडे यांनी जरी पट्टा, नितीन अडागळे यांनी गरूड टक्के, भाईसाहेब कोरे व विठ्ठल धनवे वांगी बिटरगाव करमाळा सोलापूर यांनी चांदीची अब्दागिरी, पताका मारूती लांबकाने यांनी घेत वारीच्या मार्गावर चालू लागले. चोपदार नामदेव गिराम काका यांच्यासह देशमुख व नारायण खैरे चोपदार व कानसुलकर चोपदार आपआपल्या जबाबदाऱ्या घेत पालखी राजवैभवात भजनी मंडपातून बाहेर आणली.
दरम्यान बाभूळगावकर आणि अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अश्वांसह शाही थाटात पालखी देऊळवाड्यातील मुख्य मंदिरासह शिळा मंदिराला प्रदक्षिणेस बाहेर पडली. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मोठ्या भक्तीमय वातावरणात मंदिराच्या आवारातून साडेपाचच्या सुमारास मंदिराच्या बाहेर पडली व पहिल्या मुक्कामासाठी वाजत गाजत इनामदार वाड्याकडे गेली.









