पिंपरी
सीमाभागात सातत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्याच बाजूनेच लोकमत राहिले असून, विदर्भातही स्वतंत्र विदर्भवाद्यांना जनतेने स्थान दिलेली नाही. त्यामुळे विदर्भ व सीमाभागातील जनतेची मानसिकता ही मराठीच आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. लेखक डॉ. जनार्दन वाघमारे, कवी फ. मुं. शिंदे व ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी त्यांना बोलते केले. बेळगाव व स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर बोलताना पवार म्हणाले, बेळगाव वा सीमाभागातून सातत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचेच उमेदवार निवडून येत असतात. मग भले हा भाग कर्नाटककडे असेल. मुळात सीमाभागातील जनतेची मानसिकता ही मराठी वा महाराष्ट्रवादीच आहे. विदर्भाबाबतही तसेच म्हणता येईल. विदर्भ व मराठवाडय़ात विकासाबाबत अस्वस्थता असली, तरी विचाराने हे दोन्ही भाग मराठी भाषेशी समरस झाले आहेत. स्वतंत्र विदर्भाची मागणी ही काही घटकांची असून, तो प्रामुख्याने अमराठी असल्याचे दिसते. पूर्वी हा भाग मध्य प्रांताचा हिस्सा होता व तेथे हिंदीचा प्रभाव होता. नागपूर ही राजधानीच होती. अनेकदा आम्हाला तेथे हिंदीतून भाषण द्यावे लागते. विदर्भातील बहुसंख्यांक सामान्य माणूस मराठी भाषकच आहे. म्हणूनच वेगळय़ा विदर्भाचा प्रश्न घेऊन गेलेल्यांना तेथे निवडणुकीत यश मिळालेले नाही. मुळात वेगळय़ा विदर्भाची चळवळ ही काही स्वार्थी मंडळींनी राजकीय हेतूने उभी केलेली आहे. मात्र, ती जनभावना असेल, तर आपण त्याला नक्कीच पाठिंबा देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. विदर्भ, मराठवाडा वा खान्देशकडे दुर्लक्ष होणार नाही ना, याची आपण सतत काळजी घ्यायला हवी. मराठी भाषकांच्या ऐक्याच्या आड राजकारण येणार नाही, याबाबतही दक्षता घ्यायला पाहिजे, असे नमूद करतानाच राज्याचे महाधिवक्ता मराठी भाषकांच्या भावना डावलून वेगळी भूमिका मांडत असतील, तर ती गंभीरपणेच घेतली जावी, अशी सूचनाही त्यांनी राज्यसरकारला केली.
जागतिकीकरणाच्या रेटय़ात मराठी भाषेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. इंग्रजी, प्रेंच, चिनी यातून विविध विषयांचे ज्ञान प्रसृत होत आहे. त्याचा प्रादेशिक भाषांवर परिणाम होईल, असे दिसते. मुळात मराठी माणसाची मराठीबद्दलची आस्था कमी होत आहे. पुढच्या पिढीला इंग्रजीतून शिक्षण देण्याबाबत पालक आग्रही आहेत. मात्र, मातृभाषा टिकविली पाहिजे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले, तरी शैक्षणिक संस्थांमध्ये मराठीची सक्ती करायला हवी. शासनाच्या शिक्षण विभागाने त्यासाठी पुढाकार घ्यावा. या मुद्दय़ावर कुणी तडजोड करीत असेल, तर संघर्ष करावाच लागेल.
मुलाखतीतून उलगडले पवार
आईचा दरारा, 7 विषयांत मिळालेले 35 गुण, कौटुंबिक गोडवा, यशवंतरावांच्या मार्गदर्शनातून झालेली जडणघडण, नामांतर, मुंबई बॉम्बस्फोट तसेच मी, बाळासाहेब ठाकरे व इतर सहकाऱयांनी मिळून काढलेले नि बंद पडलेले राजनीती हे मासिक यासह विविध विषयांवर पवार यांनी दिलखुलास उत्तरे दिली. शैक्षणिक जीवनाबाबत अधिक सांगण्यासारखे काही नाही. मात्र, एसएससी परीक्षेत 7 ही विषयांत 35 गुण मिळतील, याची काटेकोर काळजी घेत सायकल बक्षिस मिळविल्याचे मिश्कीलपणे सांगितले