मुंबई-बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे हे आता आमचं स्वप्न आहे असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचवेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सचिन अहिर यांचं उद्धव ठाकरेंनी स्वागत केलं. राजकारण हे राजकारणासारखं करावं लागतं. पक्ष फोडणं ही शिवसेनेची वृत्ती नाही, आम्ही आमच्या कामाने शिवसेना वाढवली आहे. मला फोडलेली माणसं नकोत, मनं जिंकलेली माणसं हवी आहेत.
सचिन अहिर यांच्या रुपाने एक चांगला नेता शिवसेनेला मिळाला आहे. त्यांच्या अनुभवाचा आम्हाला निश्चितच फायदा होईल असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईमधला चेहरा मानले जात होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत जाणं हा राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे. बुधवारीच त्यांनी त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली आणि मला पुढेही अशीच साथ द्या असे म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून सचिन अहिर शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.