भाजपने योग्य प्रमाणात जागा न दिल्यास स्वबळावर लढणार :रासप चा इशारा
पुणे :
‘ राष्ट्रीय समाज पक्षाचा जनाधार वाढल्याने पुणे महानगर पालिका निवडणुकीत योग्य प्रमाणात जागा न दिल्यास स्वबळावर लढू ‘ असा इशारा पुणे शहर राष्ट्रीय समाज पक्षाच्या बैठकीत रविवारी रात्री देण्यात आला .रासप पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते . दत्तनगर (आंबेगाव ) येथील शहर संपर्क कार्यालयात ही बैठक झाली .
मागील आठवड्यात भाजप नेत्यांची रासप शहर पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन युतीबाबत चर्चा केली होती . रासप अध्यक्ष महादेव जानकर यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे मनपाचा खडकवासला ,सिंहगड रस्ता परिसर येतो . मागील लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी या परिसरातून मोठ्या प्रमाणावर मते खेचल्याचा संदर्भ भाजप -रासप जागावाटप चर्चेत घेतला जात आहे .
रासप पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे ,महिला आघाडी शहर अध्यक्ष शीतल अनंता चव्हाण ,युवक अध्यक्ष उमेश कोकरे ,शहर संपर्क प्रमुख किरण शिंदे ,समीर मनूर ,इरफान मुल्ला ,मयूर घारे ,फिरोज खान,संगीता बिराजदार ,प्रफुल्ल सोनकवडे ,प्रकाश कदम ,सुधाकर दुर्गुडे ,नितीन पाटील इत्यादी उपस्थित होते
राष्ट्रीय समाज पक्षाने पुणे शहरात नागरी प्रश्न सोडविण्यासाठी अनेक आंदोलने केली तसेच राज्य पातळीवर पक्षाचा बोलबाला वाढत असल्याने अनेक इच्छुक उमेदवार रासप कडून लढण्यास तयार आहेत . शहर पदाधिकाऱ्यांनीही प्रभाग निवडून संपर्क वाढविला आहे . या पार्श्वभूमीवर भाजप शी चर्चेत पुरेश्या जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले