नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

Date:

मुंबई, दि. ४-  टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा साज घेत काळाप्रमाणे बदलणाऱ्या या संस्थेला राज्य सरकारच्या वतीने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालयाचा शतकपूर्तीवर्ष सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, जनतेला दीर्घायुष्य देणारी संस्था आज शतायुषी होते आहे, हे समाधान काही वेगळे असून या संस्थेचा हा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल काळात जिद्द आणि चिकाटीने काय करता येऊ शकते हे या संस्थेने दाखवून दिले आहे. संस्था निर्माण केल्यावर जीव ओतून इतरांना जीवदान देण्याचे काम या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र केले आहे. आज मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद आहेत, देव केवळ मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये नाही तर डॉक्टरांच्या रुपात रुग्णांचा जीव वाचवत आहे. कोविडचे संकट हे अनपेक्षित तितकेच अनाकलनीय होते, सुरुवातीला या संकटाची दहशत होती, मात्र आज आपण या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या, त्यामुळे राज्य सरकार, प्रशासन यांचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र, या कौतुकाचे खरे मानकरी सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.

कोविडच्या अगोदर शंभर वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली होती, आता त्याची काही माहिती उपलब्ध असेल असे वाटत नाही, मात्र यापुढे कोणताही विषाणू येईल त्यावेळी कोरोनाकाळात आपण काय केले? काय करायला हवे? याची  अधिकृत नोंद करण्याची आवश्यकता असून ही माहिती ५०-१०० वर्षानंतरदेखील उपलब्ध होईल या दृष्टिने प्रयत्न करण्याची गरज बोलून दाखवतानाच या संस्थेला जेव्हा दोनशे वर्षे पूर्ण होतील त्यावेळी इतिहासात या रुग्णालयाच्या कार्याची निश्चितच नोंद होईल असेही   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

शंभर वर्षांपूर्वी अनेक दानशूरांनी दान दिले,मदत केली म्हणून आज  आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून जीवनदान मिळाले आहे. टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय या संस्थेला १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करतानाच शंभर वर्षांनंतरही लोकांसाठी हितकारक ठरेल असे काम करून दाखवण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.

२००५ च्या मुंबईतील पूरानंतर लॅप्टो, डेंग्यूचा धोका वाढला होता त्यावेळी चाचण्या करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात पहिली लॅब सुरु झाली, नंतर कोरोनाच्या काळात चाचण्यांसाठी सुरुवातीला कस्तुरबा आणि पुण्याची एनआयव्ही अशा दोनच प्रयोगशाळा होत्या आज या प्रयोगशाळांची संख्या सहाशेच्या वर गेल्या असून पूर्वी सात-आठ हजार खाटांची क्षमता असलेल्या या राज्यात आता साडेचार लाख खाटा वाढल्या आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या तपासणीसाठी नायर रुग्णालयातच एकमेव जिनोम सिक्वेन्सिंग लॅब उभारण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

शतकपूर्तीवर्षे असलेल्या या संस्थेचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान असून ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. वैद्यकीय सेवेसाठी पुढाकार घेऊन संस्थेने केलेल्या कार्याचा पालकमंत्री असलम शेख यांनी यावेळी गौरव केला. फ्रंटलाईन वर्कर्ससाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या भरीव उपाययोजनांची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

नायरसारखी मुंबईतील सर्व रुग्णालये ही मुंबईकरांची हृदयस्थानं असून कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या काळात नायर रुग्णालयाने केलेल्या सेवेचा महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी गौरव केला. भविष्यातील कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी मुंबईतील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीदेखील महापौरांनी यावेळी दिली.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इम्युनॉलॉजी, शल्यक्रिया कौशल्य  आणि संगणकाधारित शिक्षण या तीन प्रयोग शाळांचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागनिर्मित  पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची माहिती देणाऱ्या ‘गणेशोत्सव २०२१’ या माहितीपुस्तिकेचे  तसेच नायर रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱी तसेच विद्यार्थ्यांना कोविड काळात आलेल्या अनुभवांचे संकलन असलेल्या पुस्तिकेचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे आणि उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते  प्रकाशन करण्यात आले.  भारतीय टपाल विभागाने नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त जारी केलेल्या विशेष टपाल कव्हरचे प्रकाशन आणि  संस्थेच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या भित्तीचित्राचेदेखील यावेळी अनावरण करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरातील विविध रुग्णालयांमध्ये कोविड काळात केलेल्या व्यवस्थापनाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचेही यावेळी मान्यवरांनी प्रकाशन केले. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...