पुणे-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) दहा उमेदवार हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर महापालिकेची निवडणूक लढविणार आहेत. शहर रिपाइंच्या या निर्णयामुळे पक्षाचे शहरातील अस्तित्व धोक्यात येणार असल्याचे सांगत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन केले. शहर कार्यकारिणी बरखास्त करावी, शहराध्यक्षांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
महापालिका निवडणूक भारतीय जनता पक्षाबरोबर लढविण्याचा निर्णय रिपाइंने घेतला आहे. त्यानुसार त्यांना अकरा जागा देण्यात आल्या आहेत. या सर्व उमेदवारांना भाजपचे एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे रिपाइंचे उमेदवार असूनही ते भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले होते. या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी आंबेडकर पुतळा येथे आंदोलन केले. या निर्णयामुळे पक्षाचे शहरातील अस्तित्व धोक्यात आले आहे. कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहराध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, शहर कार्यकारिणी बरखास्त करावी, अशी मागणी आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आल्याची माहिती रिपाइंचे शैलेंद्र चव्हाण यांनी दिली. शैलेंद्र चव्हाण, मोहन जगताप, संगीता आठवले, अमानुल्ला खान, अशोक शिरोळे, जयदेव रंधवे, संघमित्रा गायकवाड, शशिकला गायकवाड यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.