राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘रिंगण’ याचे पोस्टर सोशल मिडियावरून नुकतेच लाँच
करण्यात आले. या पोस्टरवर एका भिंती शेजारी वाटेकडे डोळे लावून उभी शेतकरी बाप-
लेकाची जोडी आपल्याला दिसते. तर पोस्टरच्या कोपऱ्यात कडेवर हात घेऊन उभी पंढरपूरची
माऊली आपल्याला दिसते. या माऊलीसाठी शेतकरी बाप-लेकाच्या मनात उमटलेले शब्द
पोस्टरवर अवतरले आहेत….
एका दुष्टचक्रात अडकलेली ही जोडी माऊली ला साद घालते आहे…. हे रिंगण सुटता तुटेना
माऊली! या जोडीच्या शेजारच्या भिंतीवर बाहेर जाण्याचा मार्ग लिहिलं आहे. आपल्या गोंडस
मुलाच्या साथीनं हा शेतकरी बाबा दुष्टचक्रातून मार्ग काढू शकतो का?… आपल्या बाबांच्या
खडतर प्रवासात हा मुलगा त्यांची कितपत साथ देतो?… आणि या दुष्टचक्रातून बाहेर
पडण्याचा मार्ग ही विठाई या दोघांना दाखवते का?… हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
या पोस्टरवर दिसणा-या या बाबींबद्दल विधि कासलीवाल म्हणाल्या, रिंगण मधील बाप-
लेकाचं नातं मला प्रचंड भावलं. बाप लेकाच्या त्या जोडीचा खडतर प्रवास आणि ती अफाट
दुर्दम्य इच्छाशक्ती माझ्या मनात घर करून राहिली. रिंगण च्या टीम चे कष्ट आणि
प्रामाणिकपणा ह्या चित्रपटात क्षणोक्षणी, या सुंदर प्रवासासाठी मला आतून साद घालत होते.
आणि म्हणूनच मी आता या प्रवासाची साक्षीदार झाले आहे, ‘रिंगण’ शी माझी नाळ अगदी
आतून जुळली आहे.”
तर चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांच्या मते हा चित्रपट म्हणजे, “आपल्या सुख दु:खात
मार्ग कायम आपल्या सावलीसारखा पाठलाग करत असतो आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष
करत नजर चुकवतो. आजूबाजूला सुख शोधतो आणि स्वतःला एका रिंगणात अडकवतो.”…
लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित रिंगण 30 जूनला संपूर्ण
महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

