पुणे, दि. २२ मार्च २०२२: पुणे परिमंडल अंतर्गत नुकत्याच झालेल्या कृषी वीजबिल तक्रार निवारण मेळाव्यात एकाच दिवशी ११७८ तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. सोबतच या मेळाव्यात अनेक शेतकऱ्यांनी थकीत कृषी वीजबिलांचा भरणा देखील केला. येत्या ३१ मार्चपर्यंत सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम भरून थकबाकीमुक्त होण्याची संधी असल्याने महावितरणकडून वीजबिलांबाबत तक्रारी व शंकांचे निवारण करण्याचे काम सर्व शाखा व उपविभाग कार्यालयांद्वारे यापुढेही जलदगतीने सुरु राहणार आहे.
कृषिपंपाच्या वीजबिलांच्या थकबाकीमध्ये तब्बल ५० टक्के सवलत मिळवून थकबाकीमुक्त होण्यासाठी येत्या ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी माहिती उपलब्ध करून देणे तसेच कृषी वीजबिलांबाबत तक्रारी असल्यास त्याचे तात्काळ निवारण करण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत मुळशी, नसरापूर, उरुळीकांचन, हडपसर, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर, वडगाव मावळ, लोणावळा, चाकण व तळेगाव या १४ उपविभाग कार्यालय अंतर्गत झालेल्या बिल दुरुस्तीचे मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १६२४ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ११७८ तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी योजनेची माहिती घेत तसेच तक्रारींचे शंका समाधान व निवारण झाल्यानंतर लगेचच थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग नोंदविला व वीजबिलांचा भरणा देखील केला. अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्यासह कार्यकारी अभियंता श्री. माणिक राठोड (मुळशी), श्री. हेमचंद्र नारखेडे (मंचर), मनीष ठाकरे (राजगुरुनगर) यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन कृषी ग्राहकांशी संवाद साधला.
उर्वरित तक्रारी सोडविण्यासाठी स्थळ व मीटर तपासणी व इतर कार्यालयीन कार्यवाही वेगाने सुरु आहे. दरम्यान, वीजबिलांबाबत काही शंका, प्रश्न किंवा तक्रारी असल्यास त्या पुणे परिमंडल अंतर्गत संबंधित शाखा व उपविभाग कार्यालयांमध्ये दाखल करता येईल. या तक्रारींचे ताबडतोब निवारण करण्याचे निर्देश संबंधित कार्यालयांना देण्यात आले आहेत. तसेच येत्या ३१ मार्चपर्यंत चालू बिल व सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम भरून कृषिपंप वीजबिलांमधून थकबाकीमुक्त व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

