पिंपरी-
नेतृत्वाला बदनाम करण्याचे पाप कराल. तर, याद राखा शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख व विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार सचिन अहिर यांनी दिला. बंडखोरांचा राजकीय संन्यास सुरु झाला असल्याचे त्यांनी सांगितले.पिंपरी-चिंचवड शहर युवा शिवसेना पदाधिकारी बैठकीत अहिर बोलत होते. विधानपरिषदेवर निवड झाल्याबद्दल त्यांचा शहर युवा अधिकारी विश्वजीत बारणे यांनी यावेळी सत्कार केला. युवासेनेचे पुणे जिल्हा समन्वयक राजेश पळसकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, महिला संघटिका उर्मिला काळभोर, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, कामगार नेते इरफान सय्यद, पालिकेतील माजी गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक अमित गावडे, प्रमोद कुटे, मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, पक्षाचे चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, भोसरीचे धनंजय आल्हाट आदी यावेळी उपस्थित होते.
अडीच वर्षे मंत्री, महामंडळ अशी सत्ता भोगल्यानंतर आता सांगताहेत की महाविकास आघाडीसोबत राहिले नाही पाहिजे, अशा शब्दांत अहिर यांनी बंडखोरांवर निशाणा साधला. मग, अडीच वर्षे सत्ता का भोगली, अडीच वर्षापूर्वीच का सांगितले नाही, अशी विचारणा त्यांनी केली. विधानपरिषद निवडणुकीवेळी आमदार तीन दिवस एकत्र होते. त्यावेळी बंडखोर काहीच का बोलले नाहीत. त्यांना भुमिकाच मांडायची होती. तर, हक्काचे व्यासपीठ सोडून का गेले. त्यामुळे त्यांच्या मनात काही तरी पाप, खोट आहे. हे स्पष्ट दिसत आहे. आमचा उद्धवजींवर रोष नाही, महाविकास आघाडीवर रोष आहे असे ते सांगतात. मग, उद्धवजींना का सांगितले नाही. आता बंडखोरांच्या हातात काही राहिलेलेच नाही. कारण गाडी चालविणारा दुसराच आहे, असेही अहिर म्हणाले.
बंडखोरांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे, जनता त्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, असा दावा अहिर यांनी यावेळी केला. त्यांना विधानसभेतील फ्लोअर टेस्टच्या अगोदर रोडटेस्टचा सामना करावा लागणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. कारण त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खुपसलेल्या खंजिराचा जाब शिवसैनिक त्यांना विचारणार आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी ठाकरेंना धोका दिल्याने त्यांचा शिवसैनिक व शिवसेनेशी संबंध उरला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघात ते जातील, त्यावेळी कशामुळे ही भूमिका घेतली, कोणते संकट कोसळले होते, हा निर्णय का घ्यावा लागला, याचा जाब लोकांना द्यावा लागणार आहे. पापाचे धनी हे ५० आमदार होत असतील, तर, त्यांना इतिहास कधी माफ करणार नाही, असेही ते म्हणाले

