ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : पुण्यात प्रथमच ‘रबर डाइज अँड मोल्ड्स एक्स्पो (आरडीअँडएमई) 2016’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवडमधील ऑटो क्लस्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आज (२१ एप्रिल) व उद्या (२२ एप्रिल) हे प्रदर्शन सुरु राहील. प्रदर्शनाचे उद्घाटन ‘कायनेटिक ग्रुप’चे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांच्या हस्ते आज झाले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने सर्व रबर उत्पादक कंपन्यांना आपली उत्पादने प्रदर्शित करण्याची संधी देणारे व्यासपीठ निर्माण करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल श्री. फिरोदिया यांनी ‘ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन’ (एआयआरआयए) व सहभागी कंपन्यांची प्रशंसा केली.
‘एआयआरआयए’ने प्रथमच असा आवाका असलेले हे राष्ट्रीय पातळीचे प्रदर्शन पुण्यात आयोजित केल्याची माहिती प्रदर्शनाचे अध्यक्ष, ‘एआयआरएआय’चे उपाध्यक्ष तथा ‘ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम मकर यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, की पुणे हे भारताचे वाहन व अभियांत्रिकी उद्योगाचे केंद्र असल्याने हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी आदर्श ठिकाण आहे. त्याखेरीज पुण्यात पायाभूत सुविधा, संरक्षण आदी क्षेत्रे व ‘एनसीएल’, ‘एआरएआय’ यासारख्या संशोधन संस्था कार्यरत असून आमच्या ‘एआयआरआयए’ संघटनेचे मुख्यालय जवळच मुंबईत आहे. या कारणांनी आम्ही प्रदर्शनाच्या आयोजनासाठी पुण्याची निवड केली.
‘ओरिएंटल रबर इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड’ ही भारतातील कन्व्हेयर बेल्टचे उत्पादन करणाऱ्या सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी आहे. विक्रम मकर यांना या कंपनीचा वारसा त्यांच्या आजोबांकडून लाभला असून त्यांनी या भारतीय कंपनीचे एका जागतिक कंपनीत रुपांतर करुन दाखवण्याची अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. विक्रम मकर आणि त्यांची पत्नी पूनम मकर यांनी ‘आरडीअँडएमई’चे निमंत्रक विनोद पाटकोटवार, प्राजक्ता कोटस्थाने व इतरांसमवेत अरुण फिरोदिया यांचे स्वागत केले.
‘आरडीअँडएमई’ हे लघु-मध्यम क्षेत्रातील रबर उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांना अधिक व्यवसाय संधी शोधू देणारे अशा स्वरुपाचे पहिलेच प्रदर्शन आहे. या पुढाकारामुळे रबर उत्पादक कंपन्या व डाइज/ मोल्ड्स उत्पादक यांच्यातील पोकळी भरुन निघेल. हे प्रदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाशी सुसंगत असून त्यामुळे उद्योजकता, रोजगार संधी, जागतिक सहयोग व परकी गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल.
विक्रम मकर यांच्याविषयी
विक्रम मकर हे ‘ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’चे (भारतातील कन्व्हेयर बेल्टचे उत्पादन करणाऱ्या सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते ‘आरडीअँडएमई एक्स्पो’चे अध्यक्ष व ‘एआयआरआयए’ संघटनेचे उपाध्यक्षही आहेत. गुणवत्ताप्राप्त तंत्रज्ञ असलेल्या विक्रम मकर यांना रबर उद्योगाचा २५ हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी पश्चिम जर्मनीतील ‘सिम्पेलकॅम्प’सारख्या प्रतिष्ठित कंपन्यांत प्रशिक्षण घेतले असून ‘ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन’च्या (एआयआरआयए) तांत्रिक शिक्षण समितीचे सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सिद्ध पूर्वेतिहासाबरोबरच नेतृत्वाची नैसर्गिक क्षमता त्यांच्यात आहे.
विक्रम मकर यांना प्रकल्प कार्यान्वयन, उपकरणे निवड व आधुनिकीकरणाचा विशाल अनुभव आहे. प्रक्रिया व मिश्रणातील तांत्रिक स्पर्धात्मकता, उत्पादनातील नैपुण्य व या उद्योगातील सर्वोत्तम व्यावसायिकांचे सहकार्य अशी गुणसंपदा लाभलेले ते तिसऱ्या पिढीचे उद्योजक असून त्यांनी ध्येयनिष्ठ दृष्टीकोन ठेऊन ‘ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’चे रुपांतर भारतीय कंपनीतून जागतिक कंपनीत करण्याची अभिमानास्पद कामगिरी करुन दाखवली आहे.