श्री श्री रवी शंकरजी ज्यांना सर्व गुरुजी म्हणूनही ओळखतात, त्यांच्या संस्थेला – आर्ट ऑफ
लिव्हिंगला ३५ वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने विश्व संस्कृति महोत्सव (वर्ल्ड कल्चर
फेस्टिवल) दिल्ली येथे साजरा होतोय. ११ ते १३ मार्च २०१६ ला जगातील १५५ देशातील लोक
ह्या महोत्सवाला येणार आहेत. गुरुजींच्या एक जग एक कुटुंब ह्या संकल्पनेला साजेसा हा
उत्सव होत आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे आणि अनेकविध मोठ मोठ्या
सोहळ्यांच्या आयोजनासाठी आपणा सर्वांना माहित आहे. त्या परंपरेला साजेसाच हा उत्सवही होत
आहे. अति भव्य असा हा सोहळा केवढा प्रचंड असेल ह्याची कल्पना केवळ त्याच्या
आयोजनाच्या भव्यतेवरूनच लक्षात येईल.
हा सोहळा भारताची राजधानी दिल्लीला होत आहे. ह्यासाठी सुमारे १२०० एकरच मैदान घेतले
आहे. सुमारे १५५ देशातील ३५ लाख लोक ह्या सोहळ्याला येणे अपेक्षीत आहेत. ह्याच्या
आयोजनातील प्रचंडता येथेच संपत नाही. ह्या प्रोग्रामचे व्यासपीठही असेच भव्य-दिव्य आहे.
ह्या उत्सवाची माहिती देत असताना आर्ट ऑफ लिव्हिंगचे मुंबईचे प्रशिक्षक श्री प्रफुल्ल पवार
ह्यांनी सांगितले कि ह्या उत्सवाचे व्यासपीठही ह्याला शोभेल असेच भव्य – ६ फुटबाल
मैदानांपेक्षा मोठे – ७ एकरचे आहे, आणि हा सुद्धा एक जागतिक विक्रमच आहे. जगातील
सर्वात मोठा एल ई डी स्क्रीन – १२० फूट X १८० फूट इतका मोठा स्टेजच्या पाठी असेल. अनेक
देशातील लोक खास ह्या सोहळ्यासाठी भारतात येत आहेत. सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश
जस्टीस आर सी लाहोटी आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी सरचिटणीस श्री ब्युत्रोस ब्युत्रोस घली हे
स्वागत समितीचे अध्यक्ष आहेत. नेदरर्लंडचे माजी पंतप्रधान प्रो. रूड ल्युबर्स, हे उपाध्यक्ष आहेत.
आणि श्री लालकृष्ण अडवाणी, डॉ करण सिंग, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ महेश शर्मा, पेरू ह्या
देशाच्या संसद सदस्य श्री समानिआगो, रशियातील मुर्मन्स्क शहराच्या उप राज्यपाल श्रीमती
तात्याना पोरोनोवा, जपानचे माजी मंत्री श्री शिमोमुरा, यांसारखे भारतातील व इतर देशातील
दिग्गज जागतिक नेते या समितीचे सदस्य आहेत.
जगातील सध्याच्या अशांत आणि अस्थिर परिस्थितीत, जेथे देश, धर्म, संस्कृतीच्या नावाने युद्ध
चालू आहेत, अशावेळी भारतासारख्या देशाने जागतिक शांततेसाठी पुढाकार घेणे अतिशय
संयुक्तीकच आहे. भारतात अनेक जाती, धर्म, संस्कृति असतानाही देश म्हणून आपण सर्व
एकत्रच राहतो. ह्या वैविध्यातही आपण सारे एकत्र आणि गुण्यागोविंदाने नांदतो. आपल्या देशाची
मान उंचावली जाईल अशी ही घटना घडत असताना त्यास आपण साक्षी असणे आपल्यासाठी
सुद्धा ही अभिमानाचीच घटना आहे, असे ठाम प्रतिपादन श्री प्रफुल्ल पवार यांनी केले व सर्वांना
या जागतिक कौटुंबिक स्नेह्संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
आर्ट ऑफ लिव्हिंग गेली ३५ वर्ष समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी विविध शिबिरांचे आयोजन
करून त्यांच्या जीवनातील तणाव, चिंता दूर करण्यासाठी काम करत आहे. त्याचप्रमाणे नद्या
पुनरुज्जीवन, कृषी क्षेत्रातील विविध प्रयोग, समाजातील व्यसनाधीनता दूर करणे, जेलमधील
कैद्यांसाठीची शिबिरे, १०० च्यावर आदिवासी शाळा, ग्रामीण युवकांचे नेतृत्वगुण वाढवण्यासाठी
प्रशिक्षण, यांसारखे देश-विदेशात अनेकविध प्रकल्प, आणि सर्बिया, आर्मेनिया, इराक, सिरीया,
यांसारख्या जागतिक अशांततेचे केंद्र बनलेल्या प्रदेशात शांततेसाठी कार्य करण्यात नेहमीच
आघाडीवर राहिली आहे. वसुधैव कुटुंबकम हे विश्वची माझे कुटुंब ह्या महाराष्ट्रातील संतांनी
सांगीतलेल्या वचनाप्रमाणे गुरुजींचे कार्य चालत आलेले आहे.
आत्तापर्यंत आर्ट ऑफ लिव्हिंगने १०९४ सतार वादकांचे ब्रह्मनाद, १२३० तबला वादकांचे
तालनिनाद, १३५६ ढोलवादकांचे अभंगनाद, १५० कथ्थक नृत्यांगनांचे नाट्यविस्मयम, १,१२,४४०
लोकांचे समूहगान, २१०० जणांचे भांगडा नृत्य, यांसारख्या अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करून
अनेक जागतिक विक्रमांची नोंद केली आहे. ३५ लाख लोक जागतिक शांततेसाठी एकत्र येऊन
एका जागी प्रार्थना करणे हाही एक विक्रमच आहे. न भूतो न भविष्यती असा हा नयनरम्य
सोहळा असेल याची खात्रीच ह्या आयोजनातून आपणास मिळू शकेल. सध्या सारे जागच ज्या
असहिष्णुततेच्या वातावरणाची शिकार होत आहे, त्यावेळी जगास एक सकारात्मक संदेश देण्याचे
कार्य ह्या सोहळ्याने नक्कीच होईल. आणि या ऐतिहासिक कार्यासाठी भारतापेक्षा दुसरा कुठला
योग्य देश असू शकेल? सर्वांच्या चेहऱ्यावर हसू यावे, सगळ्यांच्या जीवनात आनंद यावा या
गुरुजींच्या कार्यात आपण सगळ्यांनीच सहभागी होऊया.