पुणे- कला आणि सांस्कृतिक कलेचे माहेरघर म्हणून प्रसिध्द असणार्या पुणे शहराने नववर्ष पहाट अभिजात परांपरांच्या सुर-साथीच्या मैफीलीने करत नव्या वर्षाची सुरूवात केली. प्रसिध्द गायक राहूल देशपांडे आणि महेश काळे यांच्या स्वरसाजाने सजलेली भजन आणि नाट्यसंगीताच्या या मैफिलीचा आनंद सुमारे 4 हजार रसिक प्रेक्षकांनी घेतला व नवीन वर्षाची सुरूवात सुरेल आणि मंगलमयी केली.
‘रावतेकर ग्रूप’ तर्फे नववर्ष पहाट या अनोख्या व नवसंकल्पनेवरील मैफिलीचे आज रोजी पुण्यातील म्हात्रे पुल डीपी रोडवरील पंडीत फार्मस् येथे आयोजन करण्यात आले होते. सलग दुसर्या वर्षी या संकल्पनेवर आधारित असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. 31 डिसेंबरची रात्र नेहमीच जल्लोषाने साजरी करण्यात येते. या जल्लोषामध्ये नव वर्षाच्या पहिल्या दिवसाची रम्य पहाट पाहण्याचा, ती अनुभवायचा योग येत नाही. या वर्षी ‘नववर्ष पहाट’च्या सुरेल मैफिलीमुळे उपस्थितांनी एक चिरस्मरणीय योग अनुभवला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच नववर्ष पहाट या मैफिलीसाठी मिळालेल्या राहूल देशपांडे व महेश देशपांडे यांनी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचे मनःपुवर्क आभार मानले. 31 डिसेंबरच्या रात्रीच्या जल्लोषानंतरही पुणेकरांनी कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद दिला होता. ते पाहून राहूलने पुणेकरांच्या संगीत प्रेमास सलाम केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एक नवीन पर्व सुरू केले असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
या मैफिलीला गुंफताना राहूल देशपांडे व महेश काळे यांनी अहिर भैरवी पासून सुरूवात केली. ‘अलबेला सजन घर आयो’ या गाण्याने त्यांनी कार्यक्रमाची मध्यान केली. त्यानंतर कट्यार काळजात घुसली या नाटकातील दोन घराण्यातील फरक समजावून देताना त्यातील गाण्यांची दुहेरी पध्दतीने सादरीकरण रसिकांसमोर केले. ‘राजा पंढरीचा’ भजनाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. या भजनातील ‘विठ्ठल विठ्ठल’ या आर्जवाला रसिकांनी ‘वन्स्मोअर’ दिला. राहूल आणि महेश यांनी प्रेक्षकांची मागणी मान्य करत आपल्या सुरामध्ये त्यांनाही सामवून घेत मैफिलीला साज चढवला.
नववर्ष पहाट संकल्पनेबद्दल बोलताना राहूल म्हणाला की, दिवाळी, पाडवा किंवा दसर्याची सुरमयी पहाट आपण नेहमीच अनुभवतो. 1 जानेवारीची पहाट आत्तापर्यंत आपण अनुभवलेली नव्हती. पण नववर्ष पहाट मैफिलीव्दारे एक नवा प्रयोग रसिक श्रोते पुणेकरांसमोर सादर करण्यात आला व त्यास प्रेक्षकांनी गतवर्षीपेक्षा जास्त रिस्पॉन्स् दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योगेश देशपांडे यांनी केले. या मैफिलीला निखील पाठक यांनी तबला, राहूल गोळे यांनी हार्मोनियम, ऋषीकेश पाटील आणि राजस जोशी यांनी तानपुरा, माऊली टाकळकर यांनी टाळ अशी साथसंगत केली. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक रावतेकर गू्रपचे संचालक अमोल रावतेकर यांनी सर्व कलाकारांचे सत्कार केले व उपस्थितांचे मनःपुर्वक आभार मानले. या कार्यक्रमाची संकल्पना ‘व्हाईट कॉपर एन्टरटेन्मेंट’ व ‘सेतू अॅडव्हरटायझिंग’ यांची होती.



