पुणे :- राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सातारा जिल्हातील दुष्काळग्रस्त भागातील दिवड गावात २०० कुटूंबाना धान्याचे वाटप करण्यात आले. गेल्या २ महिन्यांपासून बावधन परिसरातील लोकांना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आपल्याकडील धान्य देण्याचे आव्हान राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.
या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत काही लोकांनी पैसे तर काहींनी धान्य देऊन तब्बल २ टन जमा झालेल्या धान्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप वेडेपाटील, सरपंच रोशन सय्यद, उपसरपंच गणेश सावंत तसेच ग्रामपंच्यायतेतील इतर सदस्यांसोबत गावकरीही उपस्थित होते
वेडे पाटील यावेळी म्हणाले,नैसर्गिक आपत्तीला आपण रोखू शकत नाही परंतु त्यावर मात नक्कीच करू शकतो यंदाच्या दुष्काळाची गंभीरता लक्ष्यात घेता मदत कार्यात राष्ट्रसेवा प्रतिष्ठानने दिवड गावाला मदत करून खारीचा वाटा उचलला आहे. गेल्या ३ वर्षापासून या गावात पुरेसा पाऊस पडत नसल्यामुळे रोजगाराचा प्रश्नही उभा ठाकला असल्यामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढत आहे. जास्तीत जास्त लोकांनी या गावाला मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या मदतीमुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी राष्ट्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप वेडेपाटील यांनी मदतीची हाक दिल्यानंतर दाखवलेल्या तत्परेबदल बावधन येथील रहिवाश्यांचे आभार मानले.

